Saturday 31 May 2014

तत्त्वभान ०३ स्वजाणिवेचे पक्व रूप १६ जानेवारी २०१४

स्वजाणिवेचे पक्व रूप
श्रीनिवास हेमाडे

ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला. प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत यात फरक केला आणि अधिक विकसित असे ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य विश्वास असा सिद्धान्त मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार मत हे बदलत्या चंचल जगाचे असते तर ज्ञान हे वस्तूंमधील सत्-सामान्यांचे किंवा सद्-रूपांचे असते.

       चेतना, जाणीव आणि स्वजाणीव हा फरक विसाव्या शतकातील एका तत्त्वचिंतकाने केला. स्वजाणीव हे केवळ माणसाचे वैशिष्टय़ आहे. मानवी जाणिवेकडे पाहण्याचा हा एक मार्ग आहे. अर्थातच तो एकमेव मार्ग नाही. जीवशास्त्रीय चेतना आणि ज्ञानशास्त्रीय चेतना हे शब्द आणखी सुलभ करावयाचे तर 'जैविक चेतना आणि ज्ञानात्मक चेतना' असे म्हणता येईल.
             या तत्त्वचिंतकाच्या मते, शरीर व जैविक चेतना यामध्ये एक मूलभूत फरक आहे. शरीर आणि जैविक चेतना यात फरक करता येतोच. शिवाय शरीर आणि जैविक चेतना एकमेकांपासून अलग होऊ शकतात, असे मानता येते. जैविक चेतना शरीरापासून अलग होणे हा मृत्यू असतो. चेतना, जाणीव आणि स्वजाणीव या तीन प्रकारांमध्ये आपण फरक करू शकतो, पण त्यांना अलग करता येत नाही. ज्ञानात्मक चेतना जैविक चेतनेपेक्षा पूर्णपणे वेगळी, अलग मानता येत नाही. स्वजाणीव ही उत्क्रांतशील संकल्पना आहे. 
स्वजाणिवेची जाणीव ही पुढील पायरी असू शकते. पण इतक्या खोलात जाण्याची इथे आत्ता गरज नाही आणि त्या रीतीची चर्चा करणे, तूर्तास अपेक्षित नाही. दुसरे म्हणजे जैविक चेतना शरीरापासून अलग झाली की शरीर जसे स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते, तसे जैविक चेतना स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते व तिचा काही मूलस्रोत आहे. तिलाच आत्मा, ब्रह्म म्हणतात किंवा कसे, याचीही चर्चा करणे तूर्तास अपेक्षित नाही.(ती नंतर कधी तरी येईलच.) 
           स्वजाणीव माणसाला 'मी कोण आहे' याचे भान देतेच, पण 'मी कोण नाही' याचेही भान देते. ज्याला आत्मदुरावा म्हणता येईल, ते जाणिवेचे एक कार्य आहे. जसे की, एखाद्या पुरुषाला 'आपण स्त्री आहोत' असे वाटते किंवा उलट. अथवा 'मी भारतीय असण्यापेक्षा आधी मी अमुक एका जाती-जमातीचा आहे, म्हणून जमातीचेच नियम मी पाळेन' असे म्हणताना भारतीय नागरिकाची कर्तव्ये दूर सारली जातात आणि जात प्रभावी ठरते. येथे आत्मदुरावा कोणता आत्मपरिचय निर्माण करते आणि कोणता अपेक्षित आहे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठीच्या कोणत्या जाणिवा निर्माण व्हाव्यात, कशा, कुणी कराव्यात हेही प्रश्न येतील. 
       स्वजाणीव पुढे कसे रूप धारण करते, त्यातून काही निष्पन्न होते ते पाहू. स्वजाणिवेचे पक्व आणि परिष्कृत रूप म्हणजे ज्ञान असे मांडता येते. ही व्याख्या नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ज्ञान या संकल्पनेकडे कसे पाहिले गेले, याकडे लक्ष वेधणे एवढाच मर्यादित हेतू येथे आहे. ज्ञान या संकल्पनेची व्याख्या करण्यातूनच सामाजिक व्यवस्थेचे राजकारण घडते, असेही दाखवून देता येईल. त्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. 
      ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला. प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत यात फरक केला आणि अधिक विकसित असे ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य विश्वास असा सिद्धान्त मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार मत हे बदलत्या चंचल जगाचे असते तर ज्ञान हे वस्तूंमधील सत्-सामान्यांचे किंवा सद्-रूपांचे (आयडियाज किंवा फॉम्र्स) असते. 'सुंदर', 'त्रिकोण', 'घोडा' विशिष्ट वस्तू इंद्रियगोचर आहेत, पण 'सुंदर', 'घोडा' यांसारख्या सामान्य पदांनी जे व्यक्त होते - म्हणजे सौंदर्य, घोडेपणा - ती विशिष्ट वस्तू नसते; तर ते एक सत्-सामान्य, सद्-रूप असते. ते केवळ विवेकशक्ती जाणू शकते. वस्तूंची स्वरूपे बदलत जातात. पण सत्-सामान्ये स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य, दिव्य आणि चिरंतन असतात. मत हे वस्तूबद्दल असते, ते वस्तूबरोबरच सतत बदलते. ते स्वीकारता येत नाही. 
          प्लेटोच्या म्हणण्यानुसार आत्म्याचे स्वरूप सत्-सामान्यांसारखे दिव्य असते व म्हणून आत्मा अमर असतो. आत्मा सत्-सामान्यांचे बौद्धिक दर्शन घेत असतो, ते ज्ञान असते. प्लेटोने हे सत्-सामान्यांचे ज्ञान व्यवहारात कसे लागू करावे, याचे दिलेले सूत्र म्हणजे साधकाचे जीवन. 
       प्लेटोचा ज्ञानसिद्धान्त इतका मौलिक आहे की सबंध युरोपियन तत्त्वज्ञान म्हणजे प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला दिलेल्या केवळ तळटिपा आहेत, असा गौरव व्हाइटहेड हा तत्त्ववेत्ता करतो. प्लेटोचे विचार ही एक मोहिनी आहे. तिच्यातून सुटणे अवघड आहे. प्लेटोच्या या भूमिकेवर विद्यमान अ‍ॅँग्लो-अमेरिकन तत्त्ववेत्ता एडमंड गेटीअर याने केलेल्या टीकेने मात्र चांगलीच खळबळ माजली.
          भारतात 'ज्ञान' ही संकल्पना धर्म आणि अध्यात्माच्या दिशेने गेली खरी, पण ती समाज व्यवस्थेचे नियामक तत्त्व म्हणून उपयोगात आणली गेली. मुळात विद्या आणि ज्ञान यात फरक झाला. जशा की चौसष्ट विद्या किंवा कला. विद्या ही स्वरूपाने तांत्रिक मानली गेली तर ज्ञान हे त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे, असा समज दृढ होता. विद्या बुद्धीशी संबंधित असते हे खरे, तथापि ती पढिक असू शकते, तर ज्ञान मात्र आत्मसात केलेले असते. ज्ञानाचा प्रत्यक्ष शिक्षणाशी संबंध असतोच असे नाही, अशिक्षित माणूसही ज्ञानवान असू शकतो. पढतमूर्ख आणि ज्ञानी यातील फरक त्यामुळेच कळतो. विद्य्ोचा जाणिवेशी संबंध नाही. पण ज्ञान हीच जाणीव आहे, असे मानण्याची परंपरा होती. वेद म्हणजे ज्ञान, (विद्- जाणणे) असे समीकरण होते. 
वेद म्हणजे ज्ञान या मूलाधाराच्या आधारे भारतीय परंपरेत सर्व विद्या व ज्ञान दोन प्रकारात विभागल्या होत्या. पराविद्या आणि अपराविद्या. पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या तर अपराविद्या म्हणजे भौतिक जगताचे ज्ञान. यात पराविद्येला प्राथम्य होते तर अपराविद्य्ोला दुय्यम स्थान मिळाले. हा भेद कधी झाला हे सुस्पष्ट नाही. पण तो प्रभावी ठरला. प्रत्यक्ष समाजव्यवस्थेत हा भेद काटेकोरपणे अमलात आला. पराविद्य्ोशी निगडित वेदोपासना, यज्ञ उच्च आणि श्रमजीवी मात्र नीच समजले गेले. म्हणजे सामान्य जीवनासाठी आवश्यक शेती, व्यापार इत्यादी कौशल्ये असणारे शूद्र, सर्वात नीच ठरले. न्याय, समता इत्यादी मूल्यव्यवस्थाच या ज्ञान कल्पनेशी जोडली होती. 
         आता एक नवी मांडणी पुढे आली आहे, तिचा विचार केला तर वेगळे चित्र मिळेल. या मांडणीनुसार वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असा नसून अग्नी असा आहे आणि वेद हा शब्द संस्कृतात रुळल्यानंतर त्याला ज्ञान असा अर्थ दिला गेला. म्हणून वेदसूक्ते म्हणजे अग्निसूक्ते, त्यांच्या संकलनाला वेद हे नाव मिळाले. अग्नीला आहुती देणे म्हणजे यज्ञ करणे हाच धर्म झाला, तेव्हा वेदसूक्तांचे पठन हा मुख्य धर्माचार होऊन तो करणाऱ्या वर्णाला श्रेष्ठत्व मिळाले. ते अबाधित राखण्यासाठी 'सारे ज्ञान वेद या संकलनात आहे' अशी स्वतची आणि इतरांची समजूत करून देण्यासाठी वेद म्हणजे ज्ञान असे सांगण्यात येऊ लागले. हे संशोधन विश्वनाथ खैरे (नवभारत, सप्टेंबर २००४) यांनी मांडले आहे. ते परंपरेला मान्य होईलच असे नाही. ही मांडणी किंवा असा नवा विचार सुरू केला तर कुंठित झालेली भारतीय परंपरा किमान पातळीवर प्रवाही होण्याचे मार्ग तर मोकळे होतील. तसे झाले तर इतर जगाचे योग्य आणि चांगले ते घेण्याचा आणि आपले त्यांना देण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.


तत्त्वभान ०२ भानावर येण्यापूर्वी ०७ जानेवारी २०१४




भानावर येण्यापूर्वी..
श्रीनिवास हेमाडे
'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान. ही अशी जाणीव मनुष्याकडे आहे म्हणून नीतिशास्त्र निर्माण होऊ शकते, 'योग म्हणजे चित्तवृत्तीनिरोधन'याचा अर्थ माणसांना कळू शकतो, धर्म- धर्माज्ञा आणि राज्यघटनाही निर्माण होऊ शकते..

        'भान' म्हणजे सावधपण किंवा जाणीव होणे. आकलन, समजणे, शुद्ध येणे हे काही इतर समानार्थी शब्द. भान हा फारसा प्रचलित शब्द नाही. जाणीव हा मात्र अधिक वापरात असलेला शब्द आहे. जाणीव म्हणजे समजूत, ज्ञान. 
                या लेखात 'जाणीव' ही संज्ञा मराठीतील अथवा कोणत्याही भाषेतील विशिष्ट शब्द म्हणून नाही तर 'एक तात्त्विक संकल्पना' या अर्थाने आणली आहे. 'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. तिचे उत्तर मानसशास्त्र, मज्जातंतूशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांकडून दिले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र तर हा स्वत:चा क्षेत्रसिद्ध अधिकार समजते. उदाहरणार्थ, जाणीव-राणीव-नेणीव किंवा बोध-अबोध मन, इत्यादी. पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. प्रश्न तात्त्विक असल्याने उत्तर तात्त्विक शोधण्याचा हा प्रयत्न आहे. 
या विश्वाविषयी माणसाला अपार कुतूहल आहे. विश्वाचे निरीक्षण करताना माणसाला दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. काही गोष्टी निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. जिवंत असणे ही सजीवता आणि जिवंत नसणे ही निर्जीवता.
            माणूस, प्राणी हे सजीव तर दगड, धोंडा निर्जीव. सजीवता ही विशिष्ट घटना आहे. काही वेळा तिची मिसळण झाल्याचे वाटून निर्जीव वस्तूही सजीव असल्याचा भास होतो. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा विश्वास होता. रेल्वेचा शोध लागला त्या काळात सुरुवातीला 'हा माणसांना खाऊन टाकणारा राक्षस आहे', असे वाटून रेल्वे ओस पडली होती. वनस्पतींनाही सजीव मानले जाते, पाणी जिवंत समजले जाते. आज संगणकाला 'विचार करणारे यंत्र' हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंत्रमानव, उपमानव या अत्याधुनिक; तर यक्ष, किन्नर या जीवयुक्त मानवाच्या प्राचीन कल्पना आहेत. वनस्पती सृष्टी, पाणी यांना सजीव मानल्यामुळे निसर्गही सजीव बनतो. एवढेच काय, पण अखिल ब्रह्मांडात पृथ्वी हाच एकमेव सजीव ग्रह मानला जातो. 
              या साऱ्या ठिकाणी सजीवतेचा अर्थ चेतना असणे असा समजला जातो. पण चेतना आणि जाणीव यात फरक करणे गरजेचे आहे. खुर्ची आणि खुर्चीत बसलेला माणूस यात फरक काय? खुर्ची जिवंत नाही, माणूस जिवंत आहे; माणसात चेतना आहे. चेतना ही काय गोष्ट आहे? ती देहाशिवाय स्वतंत्र असणारी की देहाशीच निगडित असणारी गोष्ट आहे? या चेतनेचे स्वरूप काय? बेशुद्ध माणूस आणि मृत माणूस यांच्यात चेतनाचे स्वरूप काय? 
              येथे चेतना (consciousness) आणि जाणीव (awareness) असा फरक शक्य आहे. मृतात चेतना नसते आणि बेशुद्ध माणसात चेतना असते, पण 'जाणीव' नसते. येथे मृताविषयी विचार करावयाचा नसून जिवंत माणसाविषयी विचार करावयाचा आहे. बेशुद्धावस्थेतील माणसातील चेतना ही 'जीवशास्त्रीय चेतना' आणि शुद्धीवर असलेल्या माणसातील चेतना ही 'ज्ञानशास्त्रीय चेतना' होय. या दुसऱ्या ज्ञानशास्त्रीय चेतनेलाच 'जाणीव' (awareness) म्हणता येईल. 
            आता, दुसऱ्या चेतनेबद्दल- ज्ञानशास्त्रीय जाणिवेबद्दल अधिक विचार करावा लागेल. बेशुद्धावस्थेत माणसाला कळत नसतेच, पण 'आपल्याला कळत आहे की नाही' हेही त्याला कळत नसते. म्हणून कळणे आणि आपल्याला कळणे, यात फरक करता येतो. या दुसऱ्या गोष्टीलाच बहुधा स्वजाणीव म्हटले जाते. अर्थात प्रत्येक वेळी 'आपल्याला कळत आहे' हे स्पष्टपणे कळलेच पाहिजे, असे नाही. काही वेळेला तरी 'आपल्याला कळत आहे' किंवा 'आपल्याला कळत नाही' हे त्याला नक्कीच कळत असते. हे दुसरे कळणे, हेच माणसाचे मुख्य सामथ्र्य आहे. ते ज्ञानाचे ज्ञान होय. स्वजाणिवेची जाणीव अशी पुढची पायरी असू शकते. 
माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. ही ज्ञानशास्त्रीय जाणीव प्राण्यांमध्ये नसते. प्राणी आणि माणूस यांच्या आहार, निद्रा, भय, मथुन या प्रेरणा सारख्याच असतात. पण प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते. 
            काय कळते आहे, यात स्वत:ची जाणीव समाविष्ट असल्याने माणूस 'स्व'चा शोध घेतो. हा 'स्व' म्हणजे भाषिक पातळीवर ज्याला 'मी' म्हटले जाते ते आत्मभान असते. बुद्धिमान प्राणी ते भक्त किंवा 'मी ब्रह्म' हा आत्मभानाचा कल्पनाविस्तार असतो. 
              आत्मभानाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीव कोणते मानवी कार्य घडवून आणते? ही जाणीव अनघड, भरड अशा निसर्गातून मानवी जगाची निर्मिती करण्याची प्रेरणा माणसाला देते. हे सामाजिक जग असते. पृथ्वी या खगोलशास्त्रीय जगावर सामाजिक जगाचे आरोपण होते. अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, साहित्य, सौंदर्य, नीती, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान या मानवी निर्मिती रूपात आत्मभानाचे प्रकटीकरण घडते. 
लक्षात हे घेतले पाहिजे की, रोज अन्नाची गरज असली तरी प्राणी पाकशास्त्र निर्माण करीत नाहीत, माणूस निर्माण करतो आणि माणूस पाकशास्त्र, कामशास्त्र निर्माण करतो तसा धर्मशास्त्र, धर्मग्रंथही निर्माण करतो. धर्माज्ञाही माणूसच निर्माण करतो, लिखित-अलिखित भाषा माणूसच निर्माण करतो. संयम बाळगण्याची क्षमताही 'माझी'च असते, हेही 'माझे'च भान आहे. 
           निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे. खगोलीय जगाची निर्मिती आणि तिचा संहार 'मी' करीत नाही, ते 'माझ्या' पलीकडचे आहे; बेभान झालो की सामाजिक जगाचा संहारही 'मी'च करतो. तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत. 
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून. 
          हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे (धारयति इति धर्म:) म्हणून धर्म म्हणजे लोकधारणा करणारे तत्त्व. लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते. 
       भानावर येण्यापूर्वी या रीतीचे आत्मभान आपण जागे करू शकलो तर आणखी काही गोष्टींचे भान विकसित करणे सहजी जमेल.


तत्त्वभान ०१ तत्त्वभानाच्या दिशेने ०२ जानेवारी २०१४

तत्त्वभानाच्या दिशेने 
श्रीनिवास हेमाडे
तत्त्वज्ञानाची चर्चा कशासाठी करायची? ती चर्चा, आपल्या जगण्याशी कशी संबंधित असणार आहे? ज्याचं-त्याचं, जिचं-तिचं तत्त्वज्ञान आपापल्या जगण्यातून आलेलं असतं; त्याला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून पदव्यांवर पदव्या मिळवणाऱ्या अभ्यासूंच्या लेखी काहीच अर्थ नसतो का? तत्त्वज्ञान आणि धर्म यांची सांगड भारतात आहे, त्याऐवजी ती थेट रोजच्या जगण्याशी असती, तर? .. अशा प्रश्नांचा पट मांडून त्यांची उत्तरं शोधणारं हे नवं सदर, दर गुरुवारी !
             'तत्त्वही एक मोठी चमत्कारिक संज्ञा आहे. तत्त्व आणि ज्ञान या दोन शब्दांचा सांधा जुळवून 'तत्त्वज्ञान' ही एक प्राचीन संज्ञा तयार होते. या संज्ञेचे आकलन 'माझे तत्त्वज्ञान' या नावाची स्वतंत्र ज्ञानवस्तू तयार करते. त्यामुळे जगात 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या न्यायाने जगात 'व्यक्ती तितकी तत्त्वज्ञाने' असू शकतात. परिणामी कोणालाही त्यावर बोलण्याचा अधिकार प्राप्त असतो. व्यक्तीचा आचार, विचार आणि अनुभव यांनी रचल्या गेलेल्या त्याच्या अनुभवविश्वातून निर्माण होणारे 'त्याचे तत्त्वज्ञान' ही ज्ञानवस्तू हा अधिकार त्याला जणू काही नसíगक हक्क म्हणून बहाल करते. 
              या विषयाचा सामाजिक वावर दोन पातळीवर जाणवतो. पहिली पातळी : व्यक्तीच्या जीवनविषयक आकलनाची त्याच्या भाषेतील सहज अभिव्यक्ती- जे 'त्याचे तत्त्वज्ञान' असते आणि दुसरी पातळी : चिंतनाचा अत्यंत काटेकोर कृत्रिम प्रांत- म्हणजे निखळ तत्त्वज्ञान. आधुनिक शिक्षण व्यवस्थेनुसार महाविद्यालये व विद्यापीठ पातळीवर हा अभ्यासाला असलेला, त्यात पदवी देणारा ज्ञानविषय आहे; तर जगताना भौतिक विश्व आणि समाज याबद्दल जाणिवा विकसित करण्यास गरजेचे असलेले आकलन जागविणारा तो एक सर्वमान्य सामायिक प्रांत आहे. इतर विषयांना हा उभय दर्जा लाभत नाही. जसे की जीव, भौतिक, संगणकशास्त्र तसेच राज्यशास्त्र, समाजशास्त्र अथवा वाणिज्य, व्यवस्थापन हे विषय ज्ञानाची रचना म्हणून रोजच्या जगण्यापासून वेगळे असतात. शिवाय अशा विषयावर केवळ त्यातील जाणकारच (म्हणजे किमान पदवी, पदविकाधारक) बोलू शकतात. पण तत्त्वज्ञानावर कोणीही बोलू शकतो. कारण जगणं आणि त्याबद्दलचं कोणतंही चिंतन हेच तत्त्वचिंतन असल्याने जगणं आणि त्याबद्दलचं ते चिंतन व्यक्त करणं यात फरक उरत नाही. त्यांची सीमारेषा अत्यंत धूसर असते. साहजिकच सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते पीएच.डी., डी.लिट असे अत्युच्च शिक्षण लाभलेल्या कोणालाही तत्त्वज्ञानावर बोलण्याचा नैतिक हक्क लाभतो. 
           पदवीचा अभ्यासविषय म्हणून अभ्यास मंडळ, विद्यापीठ अनुदान मंडळ, शासन यांच्या चौकटीत तत्त्वज्ञान बंद झालेले असते. अशी चौकट जीवनविषयक धारणांना नसते, त्या सतत ताज्यातवान्या असतात. विश्वाचा, निसर्गाचा, जीवनाचा रोज नवा अर्थ या धारणा जागवीत असतात. त्यांना महत्त्व देणारे, त्यांचे मूल्य जाणणारे काही थोडके, मोजके लोक असतात. त्यांच्यातूनच तत्त्वज्ञानप्रेमिक, 'तत्त्वज्ञानाचे अभ्यासक', 'तत्त्वज्ञानाचे भाष्यकार' वा तत्त्वज्ञानाचे सायंकालीन वर्ग/चर्चा मंडळे, शिबिरे निर्माण होतात. यातील सहभागींची संख्या तत्त्वज्ञानाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांपेक्षा नेहमीच जास्त असते आणि ते सचोटीने अभ्यास करतात. 
              प्राचीन भारतात तर धर्म, नीती आणि शुद्ध तत्त्वचिंतन यात फरक केला गेला नाही. असा फरक ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत काटेकोरपणे करण्यात आला. धर्मापासून तत्त्वचिंतन अलग झाल्याने धर्म हा तत्त्वज्ञानाचा शत्रू बनला. 'विज्ञान' रचण्यात वैज्ञानिक रीतीबाबत मूलभूत योगदान देऊनही (अनेक प्रकारच्या श्रद्धांना तत्त्वज्ञानाने अवकाश दिल्याने) विज्ञानानेही तत्त्वज्ञानाशी मत्री तोडली. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल यांच्या मते 'तत्त्वज्ञान हा 'नो मॅन्स लॅण्ड' दर्जाचा असा एक निर्मनुष्य प्रदेश आहे आहे की ज्यावर धर्म आणि विज्ञान या दोहोंकडून सतत हल्ले होत असतात.
           भारतात वैदिक धर्म आणि हिंदू तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले. तसेच बौद्ध धर्म आणि बौद्ध तत्त्वज्ञान आणि जैन धर्म आणि जैन तत्त्वज्ञान यांनाही एकच मानले गेले. त्यामुळे या धर्मामधील 'शुद्ध तत्त्वचिंतन' धर्मापासून स्वतंत्र होऊ शकले नाही. जणू काही धर्म आणि तत्त्वज्ञान यांचे ते अद्वैत होते. भारतात व्यक्तीने धार्मिक असणे हा त्याला त्याच्या धर्माचे तत्त्वज्ञान ज्ञात असण्याचे लक्षण आणि अधिकार समजला गेला. हा नियम प्राचीन हिंदू, बौद्ध, जैन आणि अलीकडील शीख या सर्व धर्माना समानतेने लागू असल्याचे लक्षात येते. या धर्म संप्रदायातील महाराज, गुरू, धर्मगुरू हे तर थेट त्या त्या 'धर्माचे तत्त्ववेत्ता' मानले गेले. ही प्रथा इस्लाम, ख्रिस्ती इत्यादी धर्मातही आढळेल. अशा रीतीने तत्त्वज्ञान हे नेहमी धर्माच्या दावणीला बांधले गेले. परिणामी स्वतंत्र शुद्ध तत्त्वचिंतन आकाराला येऊ शकले नाही. उलटपक्षी जे जे निखळ तत्त्वचिंतन होते, त्यात धर्माची बेमालूम सरमिसळ करून ते धार्मिक बनवले गेले किंवा धर्मशत्रू म्हणून घोषित केले गेले. 
         आज आपण जो लोकशाही जीवनप्रवास करीत आहोत, तो आधुनिक-अत्याधुनिक तत्त्वांनी भरलेला आहे. न्याय, समता, समृद्धी, शिक्षण, इहवाद इत्यादी ही तत्त्वे आपण राबवत आहोत. लोकशाहीची मूल्यप्रणाली आणि प्राचीन भारतीय धर्म व त्यातील तत्त्वज्ञान यांची सांधेजुळणी कशी करावी, याकडे जणू काही लक्षपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. या विरोधाभासाचे भानही आपणास नको वाटते. 
         साधे अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित करण्यास दोन दशके लागली. तेही एक नरबळी दिल्यानंतरच! पवित्र ऋग्वेद सनातन आहे आणि ऋग्वेदातील पुरुषसूक्तानुसार विराटपुरुषाचा बळी देऊनच वर्ण, जात, लिंगभेदवाला विशाल भारतीय समाज निर्माण झाला आहे. धर्माचे शुद्धीकरणही वैज्ञानिक रीतीने न होता राजरोस वैदिक परंपरेनुसारच होते? राजकीय पक्ष आणि धार्मिक संस्थाने व स्थळे यांना आपण प्राप्तिकरमुक्त करतो, ही एक साधी गोष्टही अनेक प्रकारचा संदेश देते. धर्म, धर्माने प्रभावित असलेले भारतीय तत्त्वज्ञान जनमानसात खोलवर रुजलेले असूनही जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा इतकी नकारात्मक का? वर्ण, जात, िलगप्रधान राजकारण आणि समाजकारण हे कोणत्या धार्मिक जीवनरीतीचा आविष्कार आहे? 'भारत हा स्वत:लाच लुटणारा देश आहे' ही जागतिक धारणा आणि 'भ्रष्टाचार' हे कोणत्या भारतीय धर्माचे आणि कोणत्या तत्त्वज्ञानाचे 'सामाजिक उत्पादन' आहे, याचे भान आपण विकसित करू शकलो तर काही एका दिशेने जाता येईल, असे म्हणण्यास जागा आहे.
         आता, 'तत्त्व' म्हणजे काय? या तात्त्विक प्रश्नाचे स्वरूप दोन रीतीने स्पष्ट करता येईल. पहिली, आजपर्यंत कोणती तत्त्वे निर्माण झाली, त्यांचा समाजावर काय परिणाम झाला आणि उलट दिशेने समाजरचनेचा या तत्त्वांवर कोणता परिणाम झाला. दुसरी रीत म्हणजे आज (कदाचित उद्यासाठी) कोणत्या तत्त्वांची गरज आहे, ती निर्माण कशी करता येतील, प्रथमपुरुषी एकवचनी 'मला स्वत:ला या प्रक्रियेत निर्माता, वाहक, प्रसारक-प्रचारक-अभ्यासक इत्यादी नात्याने सहभाग कसा देता येईल,' या दिशेने विचार करणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न करणे, हे तत्त्वभानाचे पहिले पाऊल. 
          निखळ तत्त्वचिंतन आणि धर्म यांना परस्परांपासून अलग न करणे आणि त्यांचा स्वतंत्र विकास न करणे, ही सामाजिक प्रगतीला खीळ घालणारी गोष्ट आहे, हेही भान विकसित होत नाही, हे दुर्दैवाचे आहे. जात, वर्ण, धर्म, लिंगभेद या मूलत: कालबाह्य कोटींच्या निकषांचे उपयोजन करून सामाजिक न्याय, दारिद्रय़ निर्मूलन, समान विकासाच्या संधी, राखीव जागा असे हेतू आपण साधू इच्छित आहोत. साहजिकच चुका वा तात्पुरती मलमपट्टी याखेरीज हाती काही लागत नाही. ज्यांच्या आधारे वास्तवाचे विश्लेषण शक्य होईल, अशा निखळ तात्त्विक तत्त्वांचा शोध घेता येईल का, हे पाहणे हा या सदराचा हेतू आहे. म्हणून हे 'तत्त्वभान' आहे, तत्त्वज्ञान नाही. तत्त्वज्ञान हे सामान्यांपासून दूर जाणारी काही जणांची ठेकेदारी आहे; तर तत्त्वभान हे सामान्यांशी निगडित आहे.



Thursday 29 May 2014

तत्त्वभान २२ फिलॉसॉफीचा महाराष्ट्रातील श्रीगणेशा ९ मे २०१४

लॉर्ड मेकॉले (१८०० -१८५९)
फिलॉसॉफीचा महाराष्ट्रातील श्रीगणेशा 
श्रीनिवास हेमाडे  
        प्रबोधन ही खास युरोपीय घटना असली तरी भारताच्या संदर्भात रेनेसांस, रेफर्मेशन आणि एनलायटनमेन्ट अशा तीन चळवळी मिळून जे काही होईल त्यास प्रबोधन म्हंटले पाहिजे. रेनेसांस (सांस्कृतिक नवजीवन ), रेफर्मेशन (धर्मसुधारणा) आणि एनलायटनमेन्ट (प्रबोधन- वैचारिक व वैज्ञानिक मोहीम ) अशा तीन टप्प्यात युरोपीय प्रबोधन घडले. भारतात यातील नेमके काय घडले, ते शोधावे लागेल...

फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञान या अर्थाने महाराष्ट्रात तत्त्वज्ञान या विषयाचा श्रीगणेशा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरी झाला. प्रबोधनाचा अटळ भाग म्हणून उपयुक्ततावादी नीतीविचार आधी विविध चळवळीत आणि नंतर शिक्षण क्षेत्रात एक विषय म्हणून तो अभ्यासक्रमात समाविष्ट झाला.

येथे एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. 'फिलॉसॉफी' हा शब्द पाश्चात्य विचारविश्वात आधी भौतिकशास्त्र (फिजिक्स) साठी वापरला जात होता. फिजिक्सचे मूळ नाव 'नॅचरल फिलॉसॉफी' असे होते. न्युटनच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नाव 'निसर्गविषयक तत्त्वज्ञानाची गणिती तत्त्वे' (मॅथॅमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी) असे होते. साहजिकच विसाव्या शतकाच्या दोन-तीन दशकापर्यंत भौतिकशास्त्र विभागाला डीपार्टमेन्ट ऑफ नॅचरल फिलॉसॉफी असे नाव होते. आणि प्राध्यापकांना प्रोफेसर ऑफ नॅचरल फिलॉसॉफी म्हंटले जाई. खूप उशिरा फिजिक्स आणि फिलॉसॉफी ही स्पष्ट विभागणी झाली.

महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारे एकमेव पुस्तक म्हणजे फादर मॅथ्यू लेदर्ले (१९२६-१९८६) फिलॉसॉफीकल ट्रेंड्स इन मॉडर्न महाराष्ट्रा. हा लेदर्ले यांचा पीएचडीचा प्रबंध आहे. दुसरे म्हणजे या विषयावरील एकमेव लेख म्हणजे डॉ.सदानंद मोरे यांचा "स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास'' (परामर्श नोव्हेंबर १९८८). हा शोधनिबंध मराठी प्रमाणे इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठीतील लेख महाजालावर उपलब्ध आहे.

लेदर्ले यांच्या संशोधनानुसार अभ्यासक्रमात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा प्रवेश झालंच, पण त्या आधी ख्रिश्चन मिशनरी मंडळींनीही नव्या विद्येचा प्रारंभ केला. ईस्ट इंडिया कंपनीला मिशनरी मंडळींच्या या उपद्व्याप बिलकुल मान्य नव्हता. ब्रिटिशांनी मिशनरी मंडळींना आमंत्रण तर दिले नव्हतेच, पण मिशनरी मंडळींचे येणे हे ब्रिटिशांना लाजिरवाणे वाटत होते. लेदर्ले यांच्या मते, भारतात आलेला विल्यम कॅरे हा पहिला ख्रिस्ती मिशनरी. तो १९७३ साली कलकत्त्यात आला. राजा राममोहन रॉय नंतर सतीप्रथेचे खरे स्वरूप यानेच लोकांना समजावून दिले. त्याने सेरामपुर येथे खास नेटिव्ह जनतेला "पौर्वात्य साहित्य आणि पाश्चात्य विज्ञान' शिकविण्यासाठी कॉलेज सुरु केले. त्यात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा, मुख्यतः ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रम समाविष्ट होता. या खेरीज बायबलच्या काही भागाचे भाषांतर, मराठीचे व्याकरण, पहिला मराठी-इंग्लिश शब्दकोश कॅरेने प्रसिद्ध केला. कॅरेनंतर अनेक मिशनरी येत राहिले.

डॉ. मोरे यांच्या निबंधात तीन मुद्दे आहेत. पहिला, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा, विशेषतः स्पेन्सर, मिल, बेंथम,ऑगस्ट कोम्ट यांचा लोकहितवादी, टिळक, न्या. रानडे,रामकृष्ण भांडारकर, तसेच प्रार्थना सामाजिस्ट, सुधारणावादी आणि आगरकर संप्रदाय या भारतीय सुधारकांवरील प्रभावाचे स्वरूप स्पष्ट करणे व, यातील निवडक विचारवंतांवर पडलेल्या प्रभावाची समीक्षा करणे आणि तिसरा मुद्दा , तत्त्वज्ञान विषयक मराठीतील त्या काळात महाराष्ट्रात आणि बडोदा येथे निर्माण झालेल्या साहित्याची नोंद घेणे. उलट्या क्रमाने जाता डॉ.मोरे यांच्या मते, मराठीतील महाराष्ट्रातील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा ओनामा म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४ - १८७८) यांनी लिहिलेले सॉक्रेटीसचे चरित्र. सॉक्रेटीसने महाराष्ट्रात बरेच मूळ धरल्याचे ते स्पष्ट करतात. सॉक्रेटीसचे आणखी काही लेखन झाले. मोरेंच्या लेखानंतर आणखी काही लेखन झाले. उदाहरणार्थ, प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांनी 'सॉक्रेटीसीय संवाद' (आजचा सुधारक सप्टेंबर व ऑक्टोबर १९९०) हे उत्कृष्ट अनुवाद सिद्ध केले आहेत.

डॉ. मोरे, यांच्या मांडणीतील कळीचा मुद्दा म्हणजे स्पेन्सर, मिल इत्यादींचा लो. टिळकांच्या 'गीतारहस्य' वरील प्रभाव. मोरेंच्या मते, गीतारहस्य'मुळे काही फायदे झाले खरे; पण तोटाही झाला. तो असा की त्याकाळी येऊ घातलेल्या पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या विचारांचे आव्हान स्वीकारून टिळकांनी 'गीतारहस्य' चे लेखन करताना तौलनिक तत्त्वज्ञानपद्धतीचा मोठ्या खुबीने उपयोग केला. पण त्यामुळे आधुनिक विद्वानांवर पाश्चात्य तत्त्वज्ञान व विज्ञानाचा जो परिणाम झाला होता, तो नाहीसा झाला. मुळात भारतीय तत्त्वज्ञानात जगातील सर्वच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आहेत, असा समज होता, तो तौलनिक तत्त्वज्ञानपद्धतीने अधिक घट्ट झाला आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची भारतीयामधील लाट ओसरली. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला मोठा आघात बसला. आजही 'गीतारहस्य' ची आणि टिळकांच्या भूमिकेची काटेकोर समीक्षा होत नाही, असे ते नमूद करतात.

महाराष्ट्रात विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यास प्रथम (१८८५) नागपूरच्या तत्कालीन मॉरीस आणि आजच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात सुरु झाला. तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार या महसूल विभागाचा कमिशनर सर जॉन हेन्री मॉरीस हा एलफिस्टन सारखाच मवाळ, उदारमतवादी होता. त्याच्या आदरार्थ तत्त्वज्ञान विभाग सुरु झाला आणि खुद्द मॉरीसने पुढाकार घेतला. त्यानंतर मुंबई विद्यापीठ, पुण्याचे जुने पूना कॉलेज (आजचे स.प. महाविद्यालय ) व फर्गुसन महाविद्यालय येथे तत्त्वज्ञान विभाग सुरु झाले.

सुज्ञ ब्रिटीश अधिकाऱ्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञान विद्यापीठीय व महाविद्यालयीन पातळीवर सुरु करण्यात घेतलेल्या पुढाकारामागे आणखी काही करणे होती. उदाहरणार्थ लॉर्ड मेकॉले (१८०० -१८५९) च्या मते 'सुशिक्षित नेटिव्ह इंडियन' म्हणजे ज्याला मिल्टनचे काव्य, जॉन लॉकचे तत्त्वज्ञान आणि न्युटनचे भौतिकशास्त्र ' यांचा परिचय आहे तो ! पुढे जाऊन ज्या भारतीयाला एकूणच ब्रिटीश तत्त्वज्ञान, विज्ञान आणि साहित्य यांची उत्तम जाण आहे तोच खरा 'सुशिक्षित नेटिव्ह इंडियन'. मेकॉलेने जॉन लॉकचे तत्त्वज्ञान निवडण्यामागे एक निश्चित कारण होते.

युरोपातील प्रबोधनकाळास 'प्रबोधन' म्हणण्याचे कारणच हे होते की लॉर्ड हर्बर्ट ऑफ चेरबरी (१५८३-१६४८) जॉन लॉक (१६३२-१७०४) तत्त्ववेत्त्यांनी मुख्यत्वे चर्चची भयावह जोखड व विविध कर्मकांडग्रस्त अंधश्रद्धा यातून युरोपीय जनतेच्या बुद्धीला मुक्ती दिली व सार्वजनिक जीवनात सहिष्णुतेला अवकाश दिला. विशेषतः लॉकने 'अॅन एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडीन्ग' या युगप्रवर्तक ग्रंथात " 'कुणालाही काहीही तत्त्वज्ञान सांगण्यापूर्वी आपल्या बुद्धीला कशाचे ज्ञान होणे आवश्यक आहे', हा विचार केला पाहिजे" या भूमिकेची मानसशास्त्रीय आणि समीक्षक बाजू मांडली.लॉकचा अनुभववाद हा नंतर विज्ञानाचा पाया ठरला.

या तत्त्वज्ञानाचा प्रभाव मेकॉलेवर असावा. ब्रिटीश तत्त्वज्ञान व विज्ञान तत्कालीन एनलायटनमेन्टच्या तत्त्वज्ञानात होते. ते सैद्धांतिक स्वरुपात 'फिलॉसॉफी' या नावाने भारतीयांना शिकविणे गरजेचे होते. म्हणून ते अॅकेडेमिक बनवले गेले. अर्थात मेकॉले जहाल होता तर एलफिस्टन मवाळ होता, असे म्हणता येते. कारण भारतीयांना जी इंग्रजीविद्या प्रदान करण्यात आली, त्यामागे इंग्रजी जाणणारा नोकरवर्ग निर्माण करणे, हा व्यावहारिक हेतू होताच; पण एक तात्त्विक पातळीवरील विचार एलफिस्टन (१७७९-१८५९) सारख्या सुज्ञ प्रशासकाच्या मनात होता. आज न उद्या हा देश सोडून जावे लागेल, त्यावेळी चांगले, बुद्धिमान प्रशासक व नेते असले पाहिजेत, अन्यथा चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेले तर येथील गरिबांचे खरे नाही, अशी भीती आणि शंका त्याला तीव्रतेने वाटत होती. त्यामुळे विशाल दृष्टीकोण आणि स्वतः निवडलेली तत्त्वे यानुसार जगणारा भारतीय माणूस घडविणे, हे एलफिस्टनला अपेक्षित होते. त्याला अपेक्षित भारतीय नागरिक व नेते आज आहेत, हे म्हणणे धाडसाचे आहे, हे उघड गुपित आहे.

Live Paper Link

Epaper Link  





Sunday 25 May 2014

तत्त्वभान २१ भारतातील तत्त्वज्ञानशाखा २२ मे २०१४


आचार्य ब्रजेन्द्रनाथ सील १८६४-१९३८  


भारतातील तत्त्वज्ञानशाखा 

श्रीनिवास हेमाडे 
प्रत्यक्ष 'जीवनात तत्त्वांची लढाई' इत्यादी भाषेत अव्यावसायिक रितीच्या स्वरुपात तत्त्वज्ञान आवश्यक असतेच पण व्यावसायिक, पेशा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी ते गरजेचे असते. तेथे पूर्णवेळ संशोधन केले जाते, जे त्या राष्ट्राचे विचारधन बनते. बुद्धिमता हे राष्ट्राचे भांडवल असते. 
      भारतीय प्रबोधनकालाचा इतिहास पाहता पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेश किमान दोन रीतीनी झाला, असे ढोबळमानाने म्हणावे लागते. पहिली रित प्रबोधनाच्या रुपात होती तर दुसरी रित शैक्षणिक रुपात (अॅकेडेमिक) आली. प्रबोधनाचा अनिवार्य, अटळ कार्यक्रम म्हणून प्रत्यक्ष जीवनात; राजकीय व सामाजिक सुधारणांच्या विविध प्रकारच्या चळवळीत ब्रिटीश तत्त्वज्ञान प्रवेश करते झाले. म्हणजे तत्कालीन इंग्लंडमध्ये ज्या सुधारणा ज्या तात्त्विक विचारसरणीच्या आधारे घडत होत्या, त्या सुधारणा व विचारसरणी भारतात पोहोचल्या. दुसरी रित अॅकेडेमिक स्वरुपाची होती. ती विद्यापीठात तत्त्वज्ञान या नावाने अभ्यासक्रमात समाविष्ट झाली. पहिली रित अव्यावसायिक –लोकचळवळ या स्वरुपाची होती तर दुसरी व्यावसायिक, पेशा या स्वरुपाची होती. 
          भारतातील 'ब्रिटीश राज' च्या आधी मुसलमानी व मोगल सत्तेच्या काळात ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रवेश झाला होता. या काळात भारतात मद्रसा आणि मक्तबा स्थापन झाल्या. अरबी व फार्सी भाषा-साहित्याबरोबरच धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, ज्योतिषशास्त्र,गणित कायदा इ. विषयही तेथे शिकविले जात. यात धर्मशास्त्र वगळता इतर विषय ग्रीक विद्येतून घेतले गेलेले होते. त्यात प्रामुख्याने अॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान यांचा समावेश होता. दिल्ली आणि लखनौ ही मुख्य केंद्रे होती. शहा वलीउल्लाह आणि मुल्ला निझामुद्दीन सह्लावी या दोन विद्वान, बहुभाषिक पंडितांनी 'दर्स-इ-निझामी' हा खास अॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी बनवलेला अभ्यासक्रम होता. शहाबुद्दीन घोरी, मुहम्मद तुघलक, फिरोझशाह तुघलक यांनी तसेच मोगल घराण्यांतील हुमायूनअकबर यांनी विद्यार्जनास खूपच उत्तेजन दिले. अकबराच्या काळात हिंदु-मुस्लिम पंडित एकत्र अध्ययन करू लागले. त्याने पतंजली, भास्कराचार्य दुसरे, चरक, इब्न सीना आणि अॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान यावर भर दिला. भारतीय मोगल काळात ब्रिटन-युरोपात फार काही घडले नव्हते. पण भारतात ग्रीकविद्या प्रवेश करती झाली, पण तिने मूळ धरले नाही. कारण औरंगजेबनंतरचा इतिहास वेगळा घडला. मोगल सत्तेनंतरचे जे उच्च शिक्षण ब्रिटिशांनी सुरु केले, त्यामार्फत मात्र पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञान भारतात जोमदारपणे आले. 
         'प्रबोधनकालीन भारत' या शब्द्समुहाचा अर्थ आजचा भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश. ब्रिटिशांनी विद्यापीठे स्थापन करण्यामागे दोन करणे होती. पहिले, भारताय अभिजनांनी यूरोपीय शिक्षण पद्धतीसारखे उच्च शिक्षण मिळावे, अशी सतत केलेली मागणी आणि दुसरे ब्रिटिशांनाही राज्यकारभारात व व्यापारात कारकुनी व पर्यवेक्षणाच्या कामासाठी यूरोपीय शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. त्यानुसार १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे, त्यानंतर पंजाब (१८८२), अलाहाबाद (१८८७), ढाका (१९२१), नागपूर (१९२३ ) ही विद्यापाठे स्थापन केली. अलीगढ येथे महम्मदन् अंग्लो –ओरीएंट कॉलेज (१८७५) – आजचे अलीगढ विद्यापीठ, कराचीत सिंध मद्रसा युनिव्हर्सिटी (१८८५) पेशावरमध्ये इस्लामिया कॉलेज युनिव्हर्सिटी (१०१३) स्थापन झाली. पण ती ब्रिटीशांच्या पुढाकाराने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली खासगी विद्यापीठे होती. राजा राममोहन रॉय यांच्या नेतृत्वाखाली हिंदू कॉलेज (१८१७) स्थापन झाले. हे ही खासगी होते. 
           इंग्रजीविद्येचा भाग म्हणून जेरेमी बेंथम, जेम्स मिल, त्याचा मुलगा जे. एस. मिल यांनी सांगितलेला उपयुक्ततावाद आणि हर्बर्ट स्पेन्सरची उत्क्रांतिवादी नीती यांच्या रुपात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतात प्रवेश झाला. या उपयुक्ततावाद व उदारमतवादी विचारसरणीच्या प्रभावामुळेच 'भारतीय प्रबोधनपर्व' सुरु झाले. राजा राममोहन रॉय हे प्रबोधनाचे अध्वर्यू होते. राममोहन यांना 'आधुनिक भारताचे जनक' म्हणण्याचे कारण तेच आहे. भारतीय ब्रिटीश प्रशासनात माउंट एलफिस्टनने फ्रान्सिस बेकन, डेविड ह्यूम,जॉर्ज बर्कले,जोसेफ बट्लर, तसेच जेरेमी बेंथम यांचे बरेच वाचन केले होते. ते त्याने प्रशासन करताना उपयोगात आणले. भारतात जे तत्त्वज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट झाले ते मुख्यतः विविध नैतिक सिद्धांत आणि चिद्वाद या प्रकारचे होते. 
      भारतातील तत्त्वज्ञानाचा पदवीचा अभ्यासक्रम प्रथम कलकत्ता विद्यापीठात (१९०७), नंतर मुंबई विद्यापीठ (१९१०अंदाजे) आणि मद्रास विद्यापीठात (१९२७) साली सुरु झाला. कलकत्ता विद्यापीठातील पहिले भारतीय प्राध्यापक म्हणजे आचार्य ब्रजेन्द्रनाथ सील (१८६४- १९३८). सील हे बंगाली मानवतावादी तत्त्ववेत्ते म्हणून ओळखले जातात. ते ब्राह्मो समाजाचे समर्थक विचारवंत आणि स्वामी विवेकानंद यांचे वर्गबंधू होते. तुलनात्मक धर्मशास्त्र आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यास विषय होता. 'पॉझिटीव्ह सायन्स ओफ द एनशन्ट हिंदूज् ' हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. राजा राममोहन रॉय यांना "आधुनिक भारताचे जनक ' (दि फादर ऑफ मॉडर्न इंडिया) ही पदवी सील यांनीच दिली. 
      या नीतिशास्त्रानंतर भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात, ग्रीक तत्त्वज्ञानातील मुकुटमणी सॉक्रेटीस आणि प्लेटो, अॅरिस्टॉटल, इमन्युएल कान्टहेगेलचा, त्यानंतर एफ. एच. ब्रॅडली यांचा तसेच बोझान्के, ग्रीन, बर्गासाँ, टेलर समावेश झाला. हेगेलीयन चिद्वाद व अद्वैत वेदांतातील ब्रह्म या संकल्पनेचा किंवा वेदांताचा विचार सुरु झाला. यात प्रामुख्याने हिरालाल हलदर (१८६५-१९४२) कृष्ण चंद्र भट्टाचार्य (१८७५-१९४९), योगी अरविंद (मृत्यू १९५०), म. गांधी, डॉ. राधाकृष्णन, कवी इक्बाल यांचा समवेश होतो.
       ढाका विद्यापीठात १९२१ ला तत्त्वज्ञान विभाग सुरु झाला. डॉ. जॉर्ज लांग्ले हे पहिले विभागप्रमुख आणि प्राध्यापक होते. याच वर्षी तेथे संस्कृत विभागही सुरु करण्यात आला. आज भारतापेक्षा तेथील तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापकांची संख्या जास्त आहे. 
       खरे म्हणजे हे सारे अंदाज आहेत. कारण १९ वे शतक इतके धामधुमीचे व गतिमान होते की ' पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेश' असा काही विचार सुव्यवस्थितपणे तेंव्हा झालेला नव्हता. (आजही अद्यापि तो झालेला नाही.) उदाहरणार्थ, १९०२-३ साली मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा पूर्णवेळ एम. ए. चा अभ्यासक्रम होता, अशी नोंद रा. भा. पाटणकर त्यांच्या 'अपूर्ण क्रांती' या पुस्तकात (पान १३४) करतात. त्यांनी सगळा अभ्यासक्रम दिला आहे. तर दिवंगत प्रा. डॉ. एस. व्ही. बोकील यांच्या मते मुंबई विद्यापीठात १९१० साली तत्त्वज्ञान शिकविणे सुरु झाले, असावे. 
        विद्यापीठात पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास होणे साहजिक होते पण अन्यत्र ही तो अभ्यासला गेला असे उदाहरण दुर्मिळ आहे, हे रा. भा. पाटणकर दाखवून देतात (पान १२८..). महाराष्ट्र त्या अर्थाने सुदैवी आहे. १९२० ला वाई येथे गुरुवर्य नारायणशास्त्रीबुवा मराठे यांनी प्राज्ञमठ या नावाने पाठशाळा सुरु केली ते परंपरेचे ज्ञान विकसित करण्यासाठी. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या पंडितास आधुनिक राहण्यासाठी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा समावेश त्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच त्यांनी केला होता.
         या इतिहासलेखनाची साधने अतिशय अपुरी आहेत. बहुधा इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेले विविध प्रकारचे अहवाल आणि नंतर तत्त्वज्ञानाचे पदवीधारक झालेले भारतीय, किंबहुना प्राध्यापक झालेल्यांनी लिहिलेली आत्मचरित्र वजालेखनातून अतिशय त्रोटकपणे ही माहिती मिळते. भारतात पहिल्या प्रथम कोण, कुठे, कसे 'पाश्चात्य तत्त्वज्ञान' या नावाने कुणाला शिकविले, हे अज्ञात आहे. ' पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेशाचा इतिहास 'हाच मोठा संशोधनाचा इतिहास आहे. पुढील लेखात आपण ' पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्रातील प्रवेश' कसा झाला ते पाहू. 




























Sunday 18 May 2014

तत्त्वभान १६ भारतीय उत्तराधुनिकतेचा दार्शनिक १७ एप्रिल २०१४


भारतीय उत्तराधुनिकतेचा दार्शनिक

श्रीनिवास हेमाडे

कॉम्रेड शरद पाटील 
        विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजात 'कार्पोरेट भांडवलशाही' या नावाची नवी व्यवस्था राजमान्यता घेऊन येथे स्थिरावत आहे.या खासगी आणि सरकारी नवलूटमारशाहीत वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद उभा करण्याचे आव्हान पेलणे ही भौतिक आणि तात्त्विक गरज आहे, याची जाणीव करून देणारे मौलिक विचारवंत शरद पाटील यांनी वाहिलेली ही आदरांजली.

 इंग्रजीविद्येचा परिणाम म्हणून ब्रिटीश भारतातील वैचारिक विश्वात दोन घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे "आपण आपली प्राचीन दार्शनिक परंपरा समजावून घेतली पाहिजे" हे नवे भान भारतीयांमध्ये जागे झाले. दुसरी घटना म्हणजे आपली दार्शनिक परंपरा इतर कुणीतरी समजावून देण्यापेक्षा आपणच ती समजावून दिली पाहिजे, असे आणखी एक नवे भान जागे झाले. 'समजावून देणे' ही गोष्ट दोन पातळीवर अमलात आली. पहिली पातळी  भारतीय दार्शनिक परंपरेचा जगाला यथार्थ परिचय करून देणे ही होती आणि दुसरी पातळी या परंपरेचा येथील नेटिव जनतेला सुद्धा यथार्थ परिचय करून देणे ही (आजही) आहे.   
नेटिव जनतेला केवळ परिचय करून देणे, एवढ्यावर भागणार नव्हते तर येथे मूळ धरलेल्या इम्पोर्टेड इंग्रजीविद्येमुळे भारतीय जीवनशैलीत होणारे बदल समजावून देणे सुद्धा आवश्यक होते. हे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ अशा दोन प्रकारे झाले, असे आज म्हणता येते.
स्वातंत्र्यपूर्व काळात यातील पहिल्या पातळीवरील काम बऱ्यापैकी झाले; पण नेटिव जनतेला यथार्थच काय पण साधा परिचय करून देणे सुद्धा अवघड होते. कारण 'आपल्या दार्शनिक परंपरेचे भान', या नावाची गोष्ट उघडपणे या दार्शनिक परंपरेचेच कर्मफळ असणाऱ्या वर्णजातीलिंगभेदाच्या भयावह जोखडाखाली दाबले गेले होते. शिवाय ही जाणीव करून दिली की मुख्यतः शुद्र असलेली नेटिव जनता बंड करेल ही भिती सनातन्यांना होतीच. तरीही इंग्रजी विद्येचे दर्शन अटळ होते.
 'दर्शन परंपरा' उच्चवर्ण असलेल्या ब्राह्मणी पकडीत होती. साहजिकच जगाला ती समजावून देण्याची पहिल्या पातळीवरील जबाबदारीही ब्राह्मण विद्वानांची होती.ती त्यांनी प्रामाणिकपणे  पार पाडली. (अर्थात त्यात अनेक पेच आहेत.)
 इंग्रजीविद्येतील उदारमतवादाबरोबरच जडवाद ही नवी तात्त्विकप्रणाली भारतीयांना परिचित झाली. या जडवादावर आधारलेली नवीन विचारसरणी म्हणजे मार्क्सवाद. 'वर्ग' हा या विचारसरणीचा मुख्य वादाचा मुद्दा होता. पण वर्ग नव्हे तर 'जात' हा चर्चेचा मुख्य मुद्दा आहे, याची जाणीव चर्चेच्या केंद्रस्थानी आणला तो सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यासाठी त्यांनी 'मूकनायक' मध्ये मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाचे आणि मॅक्झिम गॉर्कीच्या 'आई' कादंबरीचे क्रमशः प्रकाशन केले. आणि स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.      
साहजिकच स्वातंत्र्योत्तर काळात या जडवादी तत्त्वज्ञानाचे भारतीयीकरण करणे आणि ती येथील सामाजिक व राजकीय समस्या सोडविण्यास समर्थ आहे, असे नवे भान जागे करणे हे आव्हान होते. याचाच अर्थ 'भारतीय मार्क्सवाद' या नावाचा नवा विचार आणि चळवळ राबविणे. त्याचवेळी हा मार्क्सवाद परंपरेतील  कोणत्या दर्शनाशी जुळू शकतो किंवा नाही, याचे भान जागे करणे गरजेचे होते.
तथापि सत्तरच्या दशकापासून भारतीय स्त्रीवादाची जी शोकांतिका होत गेली तशीच भारतीय मार्क्सवादाची त्याच्या परिचयापासूनच झाली होती. भारतीय स्त्रीवाद प्रारंभीच्या काळात ब्राह्मणीच राहिला, शुद्रवर्णीय स्त्री परिघाबाहेर राहिली, आजही तिचा समावेश होत नाही (तसा आभास मात्र होतो). साहजिकच प्रामाणिकपणे अस्सल भारतीय म्हणता येईल, असा व्यापक स्त्रीवाद भारतीय विचारविश्वात अद्यापि निर्माण झालेला नाही. अगदी याच धर्तीवर भारतीय मार्क्सवाद पद्धतशीरपणे भारतीय झाला नाही. म्हणजे जातजमात आणि उच्चवर्णीय स्त्री ते शूद्रातिशूद्र स्त्रीची व्यथा 'भारतीय मार्क्सवाद'  या नावाने विकसित झालेल्या विचारसरणीत मांडली गेली नाही. या मुद्द्यावरून (सवर्ण मार्क्सवादाने पूर्ण दुर्लक्ष केल्याने) आधी आंबेडकरांचे धर्मांतर प्रकरण झाले आणि नंतर भारतीय मार्क्सवादात फुटतूट झाली.  
मार्क्सवाद हा पर्याय नसून विश्लेषणाची पद्धती आहे, याचे भान आधीच्या मार्क्सवाद्यांनी दिले होते. तथापि त्याचा विकास भारतीय दर्शनांच्या संदर्भात कसा करावयाचा याचा पहिला धडा कॉम्रेडशरद पाटील यांनीच दिला. व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांची सांगड कशी घालता येते, याचे थेट प्रात्यक्षिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी करून दाखविले.
शरद पाटील यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेले योगदान कोणते ? शरद पाटील यांचे तत्त्वज्ञान कोणते ? कुंठीत विचार प्रवाहीत केला, याचा नेमका अर्थ काय ? तर मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद विश्लेषण पद्धती, त्यातूनच विकसित झालेली सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धती आणि वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद, हे तीन मुख्य सिद्धांत हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे.
भारतीय समाजाचे विश्लेषण करणे व उपाय सुचविणे यासाठी केवळ मार्क्सवाद अथवा फुलेवाद किंवा आंबेडकरवाद पुरेसा नाही. भारतीय समाजवास्तव इतके भीषण आहे की या तिन्हींचा मेळ घालून काहीएक नवी विश्लेषण पद्धती रचली तरच भारतीय वास्तवाचे अस्सल भान येऊ शकेल, हे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे "दार्शनिक सत्य आणि भौतिक मुक्ती कधी चिरस्थायी, त्रिकालाबाधित नसते.कालचे सत्य आजचे असत्य बनून (त्या) अस्थिर सत्याला अधिक दुर्बोध करते. कालची मुक्ती आजची गुलामगिरी बनून (त्या) अस्थिर मुक्तीला आणखी अस्थिर करते" हे त्यांचे प्रतिपादन.  
या तीनही सिद्धांताचे त्यांचे स्वतःचे साहित्य, त्यांच्यावर झालेली टीका, त्याला त्यांनी दिलेली उत्तरे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्या तपशीलात जाण्यासाठी त्या साहित्याकडेच थेट वळणे, आवश्यक राहील.  
आजच्या (खरे तर कालच्या), उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत मांडावयाचे झाले तर शरद पाटलांचे कार्य विरचनावादी (डीकंष्ट्रक्शन) आणि पुनर्रचनावादी (रिकंष्ट्रक्शन) म्हणता येईल. महाभारत, रामायण, उपनिषदे, पुराणे आणि मिथके तसेच अनंत भाकडकथा यांच्या महाकथनाच्या (ग्रँड नॅरेशन) जडशीळ ओझ्याखाली दबलेली अब्राह्मणी परंपरा त्यांनी मोठ्या शर्थीने मुक्त केली. या महाकथनाचे उत्तर बारीकसारीक कथाकथनांनी नाही तर मूळ महाकथनांची विरचना करून देता येईल, असे त्यांच्या बाजूने म्हणता येईल.
भारतीय दार्शनिक आणि सांस्कृतिक जीवन केवळ ब्राह्मणी नाही तर तिला समांतर अब्राह्मणी चेतना काम करते, ती कळीची भूमिका बजावते, हे त्यांनी दिलेले भान मौलिक आहे. विशेषतः कथा, पुराणे, मिथके आणि स्त्रीशूद्रांच्या समांतर साहित्यातून त्यांचा इतिहास उलगडतो. इतिहास वर्तमानकाळाला प्रभावित करीत असतो, म्हणजेच वर्तमानकालीन समस्यांची मुळे इतिहासात असतात. इतिहास पुरुषी बनला, त्याने स्त्रीशुद्रांचा मानवी जीवन विकासातील भूमिकाच नाकारली. म्हणूनच 'घटनांची निवड' हा इतिहास लेखनातील धोका आहे, हे त्यांच्या 'निॠती' या संकल्पनेच्या विश्लेषणातून समजते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही पाश्चात्य तत्त्वज्ञानातून आयात करण्यापेक्षा बौद्ध,जैन परंपरेतून लाभू शकतात, त्यांची बीजे स्त्रीसत्तेत शोधता येतात, पण म्हणून पुन्हा स्त्रीसत्ता यावी असे नव्हे तर; समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद अनिवार्य आहे, याची जाणीव शरद पाटील करून देतात.      
शरद पाटील उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या विश्लेषण पद्धतीकडे वळले असते तर कदाचित ते आणखी नव्या अन्वेषण पद्धतीशास्त्र शोधू शकले असते. त्यांच्या माफुआ आणि सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धतीचा त्यांच्या वारसदाराकडून विकास झाला नाही तर शरद पाटील हेच शेवटचे माफुआवादी आणि सौत्रान्तिक मार्क्सवादी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.    

·         Live Paper Link
·         Epaper Link