Thursday 28 August 2014

तत्त्वभान ३५ ज्ञानाचे झाड.. २७ ऑगस्ट २०१४

knowledge tree
रेने देकार्त (१५९६-१६५०)



ज्ञानाचे झाड.. 
श्रीनिवास हेमाडे
आत्मा हे तत्त्व ईश्वरनिर्मित; परंतु प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक अशी विभागणी देकार्तने केल्यामुळे 'ज्ञानाचे झाड' धर्माच्या अंगणातून तत्त्वज्ञानाच्या अंगणात आणणे शक्य झाले..

        'पैशाचे झाड' ही संकल्पना फारच मोहक आहे. या नावाने अनेक कथा, कादंबरी, सिनेमा, नाटके, नाटुकले असे साहित्य लिहिले गेले. देश-प्रदेश, संस्कृतींनुसार अनेक म्हणी, वाक्प्रचार इत्यादी रूढ झाले. घरात असे झाड असावे, असे जवळपास प्रत्येकाला वाटते. सरकारकडे काही पैशाचे झाड नाही, असे दु:ख माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकदा सबसिडीबाबत बोलताना व्यक्त केले होते. 'पैशाचे झाड' या प्रश्नाच्या धर्तीवर ज्ञानाचे झाड असते का? ज्ञान झाडाला लागते का? (मराठी वळणाचा वाटणार नाही) असा प्रश्न उपस्थित करू. त्याचे उत्तर- 'होय, ज्ञानाचे झाड असते! त्याचे फळ खाल्ले की ज्ञान होते!' असे दिले जाते. 
        'ज्ञानाचे झाड' ही संकल्पना मुख्यत: धर्मसंस्थेकडून मिळते. 'विश्वात खरोखरच ज्ञानाचे झाड असते! ईडन बागेत ईश्वराने ज्ञानाचे झाड लावले.' हे उत्तर ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माकडून दिले गेले आहे. ज्यू धर्मानुसार या ज्ञानवृक्षाचे फळ खाणे ही शुभ-अशुभाच्या मिसळण होण्याची सुरुवात आहे, ख्रिस्ती धर्मानुसार असे फळ खाणे हे आदम-ईव्हने केलेले 'सनातन पाप' असून तिथून मानवाचे 'अध:पतन' सुरू झाले, तर इस्लाम धर्मानुसार ज्ञानवृक्षाचे फळ खाण्याने मानवाला मृत्यू भोगावा लागतो (हा ईश्वराचा वियोग असतो) आणि फळ खाणे टाळले तर माणूस अमर होतो, फळ खायचे नसते; पण ही झाली ज्ञानवृक्षाची धार्मिक संकल्पना. 
          तत्त्वज्ञानात ज्ञानवृक्षाची संकल्पना 'आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक' या बिरुदाने ओळखल्या जाणाऱ्या रेने देकार्त (१५९६-१६५०) या ईश्वरवादी तत्त्ववेत्त्याने अ‍ॅरिस्टॉटलवर टीका करताना मांडली. आधी सुटय़ा सुटय़ा विज्ञानाचा विकास होतो आणि मग तत्त्वज्ञानाचा उदय होतो, असे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे होते. तत्त्वज्ञान हे नेहमी विज्ञानानंतर येते. मानवी ज्ञानाचा प्रवास विज्ञान ते तत्त्वज्ञान असा असावा, असे अ‍ॅरिस्टॉटलचे म्हणणे आहे. देकार्तने ते फेटाळले. त्याने हा क्रम उलटा केला. 
          झाडाचे तीन भाग असतात: मुळे, त्याचा बुंधा आणि फांद्या व पाने-फुले. मुळे जमिनीत घट्ट रुजलेली व पोषण द्रव्ये पुरविणारी असतात, बुंधा हा झाडाचे एकूण वस्तुमान धारण करणारा व फांद्यांना तोलणारा मुख्य हिस्सा, तर पाने ही फळांची पूर्वतयारी असते आणि अखेरीस फळे. फळे म्हणजे झाडाचा सर्वोच्च आविष्कार आणि सर्वोत्तम निर्मिती असते. 
        देकार्तच्या मते तात्त्विक ज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान यांचे स्वरूपही असेच असते. त्याच्या म्हणण्यानुसार सर्व तत्त्वज्ञान हे जणू काही एखाद्या वृक्षासारखे आहे, ज्याची मुळे म्हणजे सत्ताशास्त्र, त्याचा बुंधा म्हणजे भौतिकशास्त्रे आणि त्याच्या शाखा म्हणजे सारी मानवनिर्मित सामाजिक विज्ञाने आहेत. 
ईश्वर, आत्मा हे विचार करणारे तत्त्व आणि बाह्य़ भौतिक विश्व या तीन तत्त्वांना देकार्त ज्ञानाची मूलतत्त्वे म्हणतो. त्यांच्या ज्ञानाचे शास्त्र ते सत्ताशास्त्र. विश्वाची रचना, पंचमहाभूते आणि समग्र प्राणिसृष्टी यांचे ज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र. त्यांचा विशेष अभ्यास म्हणजे विविध निसर्ग विज्ञाने. देकार्तने या विज्ञानांचे मुख्य वर्गीकरण केवळ तीन तत्त्वांमध्ये केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान आणि नीतिशास्त्र. 
       त्याच्या मते ही तीन विज्ञाने सत्ताशास्त्रीय ज्ञानावर आधारलेली असली तरच माणूस निसर्गावर प्रभुत्व मिळवू शकेल. म्हणजे कसे? तर देकार्तच्या मते विश्व व मानवी आत्मा ही तत्त्वे ईश्वरनिर्मित आहेत, तर विज्ञाने मानवनिर्मित आहेत. ही समस्त प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक आहे. परिणामी त्यांचे ज्ञान करून घेणे याचा अर्थ विविध विज्ञाने-शास्त्रे निर्माण करून विश्व जाणणे. विश्व जाणून घेण्याची प्रक्रिया ही त्याच्या मते अभियांत्रिकी आहे. शेवटी प्राणिसृष्टीचा सर्वात महत्त्वाचा प्राणी म्हणून माणूस समजावून घेणे. माणूस समजावून घेणे हे वैद्यकीय विज्ञान आहे, तर माणसाचे आध्यात्मिक व नतिक जीवन समजावून घेणे हे नीतिशास्त्र आहे. 
        या मांडणीतून देकार्त तीन गोष्टी साधू इच्छितो. पहिली- सर्व विज्ञानांमध्ये आंतरिक सुसंगतता असते, एकाचा दुसऱ्याशी निश्चित प्रकारचा ताíकक संबंध असतो. दुसरी म्हणजे कोणतेही विज्ञान माणसाच्या रोजच्या जगण्यात व्यावहारिकदृष्टय़ा उपयुक्त असले पाहिजे. तिसरे म्हणजे कोणत्याही ज्ञान-विज्ञानाची रचना उथळपणे न करता मूलभूत तात्त्विक पायापासून केली पाहिजे तरच ते ज्ञान-विज्ञान समाजजीवनात उपयुक्त ठरेल. 
       देकार्तच्या मते, सर्व विज्ञानांमध्ये आंतरिक सुसंगतता प्रस्थापित करता आली तर कोणतेही विज्ञान सामाजिकदृष्टय़ा उपयुक्त होईल. प्रत्येक ज्ञान-विज्ञान तांत्रिकदृष्टय़ा बोजड न होता सुगम शैलीत मांडता येईल. वैद्यक विज्ञान जीवरक्षक आहे, अभियांत्रिकी सर्व ज्ञानाचा गाभा ठरेल आणि नीती ही तर मूलभूतच असते. या रचनेतून प्रत्येक विज्ञानाला एक नतिक आधार मिळेल.
       अ‍ॅरिस्टॉटलच्या मते, विज्ञान ते तत्त्वज्ञान असे ज्ञान मिळवावे, तर देकार्तच्या मते नीतीचे ज्ञान ते तत्त्वज्ञान व्हाया विज्ञान असे ज्ञान मिळवावे. असे का करावे? तर, झाड महत्त्वाचे कधी असते? झाडाचे महत्त्व जोखले जाते ते फळावरून. फळ रसरशीत, सुमधुर, सुगंधी असेल तर झाड चांगले. त्यासाठी झाडाची मुळे मजबूत आणि बुंधा भरभक्कम सकस पाहिजे. मुळे जमिनीत गाडली गेलेली असतात, त्यामुळे ती दिसत नाहीत; पण फळे चटकन हाताशी येतात, बाजार त्यांनाच मिळतो. म्हणून मुळे मजबूत, रसरशीत व बुंधा भक्कम हवा. फळांमध्ये उपयुक्तता आणि गुणवत्ता असेल तर ती रसाळ गोमटी असतात, तसे नसेल तर फळे निकृष्ट निपजतात! 
        हाच नियम ज्ञानवृक्षाला लावावा. फळरूपी नीतीपासून ज्ञानार्जन सुरू करावे, मग विविध सामाजिक आणि निसर्ग विज्ञाने यांचा अभ्यास करावा आणि अखेरीस ईश्वराकडे जावे. ज्ञान खालून, मुळापासून नाही तर वरून मुळाकडे असे मिळवीत जावे. देकार्तच्या मते, जे ज्ञानविज्ञान यथार्थ नतिकता निर्माण करीत नाही ते ज्ञानविज्ञान अनतिक असते. समाजाची प्रत, दर्जा हा नेहमी त्या समाजाच्या नतिकतेवरून निश्चित होतो. म्हणून व्यक्ती व समाजाची नतिकता मोजूनच समाजाची प्रगती मोजता येते, अन्यथा नाही. म्हणून नीतीपासून सुरुवात करावी, मग अध्यात्माकडे, तत्त्वज्ञानाकडे जावे. 
        देकार्तची महती नीतिशास्त्राबद्दल फारशी नाही. त्याने नतिक आणि सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाचे चिंतन केले नाही, असा समज आहे. त्याच्या मते तत्त्वज्ञानाचा अंतिम मानवी हेतू आनंद आणि सुख मिळविणे हाच असतो, हे व्यावहारिक धोरण असते. राणी एलिझाबेथबरोबर झालेला पत्रव्यवहार आणि 'तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे' या ग्रंथात त्याने त्याचे नीतिशास्त्र मांडले. ते करताना त्याने 'तत्त्वज्ञानाचे झाड' ही संकल्पना मांडली.      देकार्तची हे 'तत्त्वज्ञानाचे झाड' लक्षात घेता आज विसाव्या-एकविसाव्या शतकात या झाडाला अनेक उपयोजित नीतीची आणि उपयोजित तत्त्वज्ञानाची अनेक फळे आलेली आहेत. त्यांचे स्वरूप क्रमश: पाहू.


Live Paper Link                 Epaper Link 

Thursday 21 August 2014

तत्त्वभान ३४ 'स्त्रीवादी तपासणी'चे तत्त्वचिंतन २१ ऑगस्ट २०१४

मेरी अॅलन व्हेथ 

'स्त्रीवादी तपासणी'चे तत्त्वचिंतन
श्रीनिवास हेमाडे 
विद्यापीठीय क्षेत्रातील तत्त्वज्ञानाचे पुरुष प्राध्यापक महिला सहकारी वा विद्यार्थिनींशी कसे वागतात, इथपासून ते तत्त्वज्ञानाचा ज्ञात पाश्चात्य इतिहासच पुरुष तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांची हेळसांड केल्याचा आहे काय, इथपर्यंतचे प्रश्न विचारत, काहीशी उलटतपासणी करण्याच्या पद्धतीतून महत्त्वाचे नैतिक प्रश्न समोर आले. स्त्रियांचे तत्त्वज्ञानक्षेत्रातील योगदान समजून घेतले पाहिजे, हा विचार प्रयत्नपूर्वक दृढ करण्यात आला. अशा काही प्रयत्नांची ही दखल..
स्त्री पुरुषापेक्षा अधिक सबळ, स्थिरचित्त आहे आणि ईश्वरापासून दूर जाणाऱ्या, ईश्वराला काहीही देण्याची इच्छा न करणाऱ्या पुरुषापेक्षा अधिक उत्तम आहे. तिचा समर्पण भाव भक्तीने रसरसलेला असतो, असे ऋग्वेद म्हणतो (५.६१.६). 

        महर्षी व्यास, वाल्मीकी, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, महंमद पगंबर, येशू, झरतुष्ट्र, पाणिनी, कालिदास किंवा राम, श्रीकृष्ण, लोकहितवादी, नामदार गोखले, न्या. रानडे, फुले, टिळक, आगरकर,आंबेडकर, गांधी, होमर, सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, कांट, हेगेल, रुसो, गॅलिलिओ, न्यूटन, आइन्स्टाइन किंवा मार्क्‍स, लेनिन, मिल, विटगेन्स्टाइन, रसेल, चॉमस्की, ही आणि अशी नावे नीट निरखून पाहिली तर काय लक्षात येईल? 
         तर, 'ही सर्व मोठी माणसे धर्मसंस्थापक, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, विचारवंत आहेत (म्हणजे होती!). त्यांनी खूपच मूलभूत विचार मांडून मोठी क्रांती केली, दिशा दिली, समाजजीवनाचा ढाचाच बदलून टाकला,' इत्यादी इत्यादी महान विचार सुचतील, यात शंका नाही. पण आपल्या एक लक्षात येते का? की यात एकही स्त्रीचे नाव नाही. 
          वैचारिक क्षेत्रात स्त्रिया का नसतात, असा प्रश्न एके काळी उपस्थित केला गेला, आजही केला पाहिजे. ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान असो की भारतीय दर्शन परंपरा असो अथवा अन्य संस्कृती असो; तत्त्वचिंतनाच्या इतिहासात स्त्रियांचा उल्लेख आढळत नाही. स्त्रियांनी विचार निर्माण करणे, त्यातून त्यांनी स्वतंत्र, सुसंगत ज्ञानरचना करणे हे मुद्दे पुरुषांनी वादग्रस्त बनविले आहेत. तत्त्वचिंतनातील स्त्रीचे स्थान हा विषय खूप व्यापक आणि बहुआयामी आहे. त्यातील प्रत्येक आयामाचा केवळ उल्लेख करणे, हेसुद्धा या मर्यादित जागेत शक्य होईल, असे नाही. स्त्री आणि तत्त्वज्ञान अशा आशयाचा अभ्यास बहुधा लिंगभाव अभ्यासाचा एक भाग म्हणून होतो, स्त्रीने तत्त्वज्ञ असणे, या तात्त्विक भूमिकेतून होत नाही. 
        प्राचीन काळापासून स्त्रीचे स्थान पुरुषांच्या राजकारणात केवळ युद्धाचे किंवा तडजोडीचे साधन म्हणूनच राहिले आहे. तत्त्वज्ञानाचे क्षेत्रही त्यास अपवाद नाही, किंबहुना त्यासाठीच तत्त्वज्ञान राबविले गेले. स्त्री आणि पुरुष यांच्यातील युद्धाचे सविस्तर विश्लेषण मराठीत मार्क्‍सवादी-फुले-आंबेडकर अन्वेषण पद्धती वापरून कॉ. शरद् पाटील यांनी केली. ही चिकित्सा अभ्यासक्रमाचा भाग बनू शकत नाही, हे आपले दुर्दैव. 
          प्राचीन भारत आणि ग्रीसमध्ये अनेक तत्त्वचिंतक स्त्रिया होऊन गेल्या. लोपामुद्रा, विश्ववरा, शाश्वती, गार्गी, मत्रेयी, घोषा आणि आदिती या स्त्रिया देवराज इंद्राच्या गुरू होत्या. त्यांना ब्रह्मवादिनी म्हटले आहे. सांख्य दर्शनातील प्रकृति, ज्ञानदेवता सरस्वती स्त्रीरूपिणी आहेत, आदि शंकराचार्याना हरविणारी पंडिता भारती वा सरस्वती, ग्रीक थेमिस्टोक्ली (पायथागोरसची गुरू) वा पायथिया, अस्पेशिया, डायोटिमा (तिघी सॉक्रेटिसच्या गुरू), हायपेशिया, अ‍ॅरेटी, अ‍ॅसक्लेपीजेनिया (ग्रीक-इंग्लिश नावाचे अंदाजे उच्चार) ही काही नावे. या स्त्रियांचे कार्यकर्तृत्व तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचा भाग बनू दिला गेला नाही. तत्त्वज्ञानातील स्त्रियांचा इतिहास विसाव्या शतकाच्या अखेरीस लिहिला जाऊ लागला. 
        मेरी अ‍ॅलन व्हेथ (प्राध्यापक, क्लीव्हलॅण्ड स्टेट युनिव्हर्सिटि) या अमेरिकी विदुषीने 'ए हिस्ट्री ऑफ विमेन फिलॉसॉफर्स' या नावाचे चार मोठे खंड प्रसिद्ध केले. ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान प्रथमपासून कसे पुरुषी, उर्मट आणि अरेरावीचे आहे, याचे सविस्तर विश्लेषण देणारे अनेक संशोधन प्रकल्प तिने सिद्ध केले आहेत. स्त्री तत्त्ववेत्त्या कशा वैचारिक यज्ञात हेतुत: बळी दिल्या गेल्या याचे भेदक वर्णन करणारे 'हिस्टेरेक्टोमायिझग फिलॉसॉफी : हाउ फिलॉसॉफी बिकेम मॅस्क्युलीन'सारखे शेकडो लेख तिने लिहिले. स्त्री तत्त्ववेत्तींचे तत्त्वज्ञान शिकवताना संभाव्य पुरुषी धोके लक्षात घेऊन व्हेथने 'स्त्री तत्त्ववेत्तींचे तत्त्वज्ञान शिकवावे कसे याचा अभ्यासक्रम' तयार केला (डेव्हलिपग अ करिक्युलम फॉर टीचिंग वर्क्‍स ऑफ विमेन फिलॉसॉफर्स). व्हेथबरोबरच सेसिली टोगास (प्रेझेंटिंग विमेन फिलॉसॉफर्स), मेरी वॉरनॉक, (विमेन फिलॉसॉफर्स), जॉर्ज यान्सी डय़ूकेस्ने (दि सेंटर मस्ट नॉट होल्ड : व्हाइट विमेन ऑन व्हाइटनेस ऑफ फिलॉसॉफी) ही अन्य काही महत्त्वाची नावे सांगता येतील. इतरही बरेच अभ्यासक आहेत. 
         तत्त्वज्ञानातील स्त्रीचे योगदान या विषयाच्या निमित्ताने विसाव्या शतकाच्या अखेरीस युरोप-अमेरिकेत प्राध्यापकी करणाऱ्या पुरुष तत्त्ववेत्त्यांकडून या क्षेत्रातील स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणाचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे तात्त्विक स्त्रीवादाला नवा आयाम मिळाला. त्याचा इतिहास अद्यापि लिहिला गेला नाही, पण लेखनातून शोषणाचे स्तर आणि पुरुषी दहशतीचे प्रकार उजेडात आले. 
        युरोपात स्त्रीमुक्ती चळवळ आणि वर्णभेदाविरुद्ध चळवळ सामान्य स्त्रियांसाठी झाली. तिचे पडसाद उच्च शिक्षण क्षेत्रातही झाले. त्या काळी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका यांना पुरुष प्राध्यापकांच्या मानसिक आणि लैंगिक छळणुकीविरुद्ध लढा द्यावा लागला. या लढय़ात स्त्रियांची सरशी झाली, पण फक्त गोऱ्या विद्याíथनी आणि प्राध्यापिका यांचीच. पण नंतरच्या स्त्रीमुक्ती लढय़ात वर्णभेदाची भर पडली. कारण गोऱ्या पुरुष प्राध्यापकांनी काळ्या विद्यार्थिनी आणि काळ्या प्राध्यापिका यांचा छळ चालूच ठेवला होता. त्याचा विपरीत परिणाम तत्त्वज्ञान या विषयावरही झाला. एक तर, गोऱ्या पुरुष प्राध्यापकांच्या अरेरावीमुळे काळ्या विद्यार्थिनी तत्त्वज्ञान या विषयाकडे येऊ शकत नव्हत्या. दुसरे म्हणजे, पात्रताधारक काळ्या स्त्रियांना प्राध्यापकी मिळू द्यायची नाही, असा चंग गोऱ्यांनी बांधला होता. या साऱ्या व्यवस्थेविरुद्ध काळ्या विद्याíथनी आणि काळ्या प्राध्यापिका यांना वेगळा लढा द्यावा लागला. लिंगभेद आणि वर्णभेद यामुळे काळ्या विद्याíथनी आणि काळ्या प्राध्यापिका यांना तत्त्वज्ञान या विषयाचे शिक्षण, संशोधन, नोकरी यात भयंकर छळ सोसावा लागला. यासंबंधात अनेक ब्लॉग आहेत. 
        'अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड' या लेविस कॅरोलच्या दीर्घकथेतील अ‍ॅलिस ही स्त्री म्हणून तत्त्वज्ञान शिकायला एखाद्या विद्यापीठात गेली तर तिचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कसा छळ करतील याचे वर्णन करणारी 'अ‍ॅलिस इन फिलॉसॉफी लॅण्ड' नावाची विडंबन कथा प्रस्तुतच्या व्हेथ यांनी लिहिली. 
       लिंगभेद करणारे पुरुष तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक पाहता यांना 'ज्ञानाचे प्रेमिक' (लव्हर्स ऑफ विज्डम = फिलॉसॉफर) का म्हणावे, असा प्रश्न मारियाना ओत्रेगा ही अभ्यासक विचारते आणि 'जर परीक्षण न केलेले जीवन जगण्यालायक नसेल' (सॉक्रेटिसचे वचन) तर स्वत:चे परीक्षण न करणारे तत्त्वज्ञान, ते दूषित तत्त्वज्ञान शिकविणारे तत्त्वज्ञान विभाग आणि ते पाखंडी प्राध्यापक काय कामाचे, असा सवाल एलिझाबेथ स्पेलमन ही विदुषी उपस्थित करते. तत्त्वज्ञान विभागातील पुरुष सहकारी प्राध्यापकाकडून सच्च्या दिलाने सहकार्य न मिळणे , तत्त्वज्ञान विभागातील एकूण थंड, बेमुर्वत व परकेपणाचे वातावरण यामुळे तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांवर विपरीत परिणाम होतो, असे निरीक्षण सॅली हॅस्लंगर (एमआयटी, केम्ब्रिज) ही तत्त्वज्ञानाची प्राध्यापिका नोंदविते. अशा प्रकारचा अभ्यास युरोपीय-पाश्चात्त्य राष्ट्रांत होतो, भारतात का होत नाही, यावर स्वतंत्र लेखन करावे लागेल.

Live Paper Link                        Epaper Link 

Wednesday 13 August 2014

तत्त्वभान ३३ अडथळेच अडथळे ! १४ ऑगस्ट २०१४



अडथळेच अडथळे ! 
श्रीनिवास हेमाडे

    भारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक लक्षण आहे. भारतीय दर्शन परंपरा ज्या काटेकोर तार्किक रीतीने तात्त्विक विचार करण्यास शिकविते त्या रीतीने आपण विचार करीत नाही, कारण ते विचार व पद्धती आपणापर्यंत पोहोचलीच नाही.

       सामान्य लोकांसाठी तत्त्वज्ञान जाणीवपूर्वक का उपलब्ध झाले पाहिजे? प्लेटोपासून विसाव्या शतकातील अनेकांच्या तत्त्वज्ञानामागील हेतू खरेच लोकाभिमुख होते का? त्यांचे लेखन खरेच लोकसुलभ होते का? हे प्रश्न केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न उपस्थित करतात; आणि उत्तर देतात की, 'तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध झाले पाहिजे, याचा अर्थ लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे म्हणजे लोकांना तत्त्वज्ञानाच्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन देणे.'
       ब्लॅकबर्न यांनी उपस्थित केलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी केलेले विश्लेषण आपण भारतीय विचारविश्वाला अर्थात भारतीय दर्शन परंपरेच्या संदर्भात उपस्थित केला तर काय चित्र दिसेल, त्याचा विचार आज करू. त्या प्रश्नांचे स्वरूप साधारण असे राहील : भारतीय दर्शन परंपरा सामान्य लोकांसाठी होती का? त्यांना कळेल अशा लोकसुलभ भाषेत ती मांडली गेली का? या दर्शन परंपरेच्या विचार करण्याच्या शैलीचा परिचय लोकांना करून दिला गेला का? आणि मुख्य म्हणजे लोकांना दर्शन परंपरा ज्या रीतीने विचार करते त्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन दिले गेले का? याचाच अर्थ (राजकीय भाषेत) भारतीय जनता भारतीय दर्शन परंपरेत जे काही सांगितले आहे तशी जीवनशैली अंगीकारत आहे का?
           या प्रश्नांच्या उत्तरासाठी आधी आपणास 'भारतीय दर्शन परंपरा म्हणजे काय?' हा प्रश्न उपस्थित करावा लागेल. त्यासाठी त्या परंपरेचा परिचय करून घ्यावा लागेल. बठक मारून तिचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी पसा, वेळ, श्रम, चिकाटी आणि मुख्य म्हणजे भारतीय दर्शन परंपरेविषयीचे प्रेम आपल्या अंत:करणात निर्माण करावे लागेल. समजा, या अटी पूर्ण केल्या; आता मार्ग सोपा झाला आहे. पण थांबा, हे केवळ आपले 'वाटणे' आहे! म्हणजे आपली भावना आहे. वास्तवात तसे नाही. ते का नाही, हेच पाहावयाचे आहे.
       इथे भारतीय दर्शन परंपरेचे स्वरूप पाहण्याआधी ब्लॅकबर्न यांनी (पाश्चात्त्य तत्त्वज्ञानासंदर्भात) नोंदविलेली तीन निरीक्षणे लक्षात घेऊ. पहिले, 'कांट, हेगेलपासूनच्या तत्त्ववेत्त्यांची पल्लेदार विधानांची मुक्त पखरण आणि व्याकरणीय नियमांची गुंतागुंत असलेली भाषाशैली' आणि दुसरे, 'त्या काळात इंग्लिश ही जनभाषा असताना लेखन प्रतिष्ठित व अभिजात समजल्या जाणाऱ्या जर्मन भाषेत करणे' (ज्याचा परिणाम म्हणून तत्त्वज्ञान सामान्यांपासून दूर गेले), तिसरे निरीक्षण म्हणजे 'हे सारे काही हेतुपूर्वक घडलेले नाही.' (अवतरणांतील निरीक्षणे ब्लॅकबर्न यांचीच आहेत. विशेषत: इंग्रजी व जर्मनबद्दलचेही.) याचा अर्थ असा की, लोकभाषा हे व्यापक माध्यम पूर्ण ताकदीने वापरले गेले नाही; पण विविध कारणांमुळे एकोणिसाव्या शतकात इंग्लिश ही ज्ञानवहनाची आणि म्हणून ज्ञानउत्पादकांची भाषा बनली; म्हणजेच तिला विश्वभाषा हा दर्जा मिळाला तेव्हापासून ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना उपलब्ध झाले. तत्त्वचिंतन सोपे करता येते, असा आशय मांडणारी भाषिक विश्लेषणाची चळवळही रुजली.
        आता, प्राचीन भारतात दर्शन परंपरेची भाषा कोणती होती? दर्शन परंपरा वैदिक आणि अवैदिक अशी विभागली गेली आहे. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग आणि पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदान्त) ही वैदिक आणि बौद्ध आणि जैन ही अवैदिक दर्शने मानली जातात. या सगळ्यांना विरोध करणारी चार्वाक/लोकायत विचारसरणी (आजच्या भाषेत हिंदू पण) अवैदिक मानली गेली. या सगळ्यांचा हेतू एकच आहे, तो म्हणजे दु:खमुक्ती! 
        प्राचीन काळापासून भारतात संस्कृत आणि इतर प्राकृत भाषा आहेत. प्राकृत भाषा बहुधा प्रादेशिक लोकभाषा आहेत. आजही अनेक लोकभाषा आहेत. संस्कृतचेही प्राचीन संस्कृत आणि अर्वाचीन संस्कृत असे प्रकार करावे लागतील.
           वैदिक दर्शने मुख्यत: संस्कृतात सूत्रशैलीत मांडली गेली. प्राचीन बौद्ध दर्शन पाली भाषेत आणि प्राचीन जैन दर्शनही मूलत: अर्धमागधी भाषेत आहे. याचा अर्थ प्रारंभी वैदिक व अवैदिकांच्या ज्ञानभाषा स्वतंत्र होत्या; पण नंतर भारतीय दर्शनांचा विकास खंडनमंडन पद्धतीतून झाला. त्यातून संस्कृत ही ज्ञानभाषा बनली.
           संस्कृतमुळे एकसूत्रीकरण झाले, ही एका अर्थाने विधायक गोष्ट झाली; पण त्यामागे दर्शनांच्या प्रांतात अंतर्गत विघातक राजकारण झाले. पहिले म्हणजे या तात्त्विक चर्चा प्राचीन काळी अतिशय छोटय़ा, खूपच मर्यादित संख्येच्या गटात होत राहिल्या, केल्या गेल्या किंवा झाल्या. म्हणून गुरुकुलही अतिछोटे होते. त्यात प्रवेश मिळणे अवघड होते. आत काय घडत आहे, हे बाहेर कधीच कळत नव्हते. पूर्वपक्ष हेतुत: चुकीचा मांडला गेला, अवैदिकांचे मूळ साहित्य नष्ट करण्यात आले किंवा तसे आटोकाट प्रयत्न झाले. अवैदिकांच्या विरोधात चार्वाकांना उंट म्हणूनच वैदिकांनी वापरले. त्याला बौद्ध आणि जैनांनी हरकत घेतली नाही. कारण चार्वाक त्यांचेही विरोधक होते! हा पहिला तात्त्विक बळी इहवादाचा ठरला. म्हणजे जे खऱ्या अर्थाने सामान्यजनांच्या सुखाचा, मन:शांतीचा विचार करणारे इहवादी होते, ते वैदिकांच्या वेदीवरील पहिले तात्त्विक हुतात्मा झाले. दुसरे अंतर्गत नुकसान म्हणजे वैदिकांची तांत्रिकदृष्टय़ा किचकट चर्चा पद्धतीची लागण बौद्ध व जैन दर्शनांनाही झाली. तेही पंडिती (स्कोलॅस्टिक) बनले. तिसरे कारण, हे चर्चागट मुख्यत: वर्णग्रस्त आणि पुरुषप्रधान होते. हे सारे जाणीवपूर्वक झाले, हा आक्षेप येथे येतो. इथूनच भारतीय जनतेचा तात्त्विक आत्मदुरावा सुरू झाला.
         सामाजिकदृष्टय़ा भारतीय तत्त्वचिंतन संस्कृतमध्ये बंदिस्त झाल्याने ते लोकांपासून दूर गेले, हे मूलभूत कारण मानावे लागेल. वैदिक दर्शनांचे स्वरूपच असे बनले की ते सांस्कृतिक वर्चस्वाचे व धार्मिक दहशतीचे शस्त्र बनले. वर्ण-जात-लिंगभेद याचा पुरस्कार करणारे तात्त्विक साहित्य निर्माण झाले. ज्ञानबंदी हेच तत्त्वज्ञान होते. हा अडथळा स्वरूपाने धार्मिक असल्याने त्यात कुणीही हस्तक्षेप केला नाही, उलट त्या भेदाभेदाचा वापर करून घेतला गेला. बौद्ध दर्शनाचा भारताबाहेर प्रसार-विकास होण्याचे भाषिक कारण या दर्शनाने त्या त्या देशाच्या भाषा स्वीकारल्या. अशा रीतीने ही उच्च भारतीय दर्शन परंपरा स्वदेशात 'परकी' झाली.
       आता या ज्ञानबंदीविरोधात अतिशय उच्च पातळीवर बंडखोरी केली ती चक्रधर, ज्ञानेश्वर ते तुकडोजी महाराजांपर्यंतच्या सर्व संत मंडळीनी. संत ज्ञानेश्वर हे अस्सल भाषिक देशीवाद मांडणारे पहिले विचारवंत होते. त्यांच्यापासून सर्व संतांनी तत्कालीन साध्या प्रादेशिक लोकभाषेत ओवी, अभंग इत्यादी शैलीत पारंपरिक तत्त्वज्ञान मांडण्याची परंपरा आणली. तुकोबा त्यासाठीच खडा सवाल करतात, 'संस्कृत देवे केली अन् प्राकृत काय चोरापासून झाली?'
    पण ही बंडखोरी भाषेपुरतीच मर्यादित ठरली. लोकांना तत्त्वज्ञान उपलब्ध झाले, सुलभ झाले, शैलीचा परिचय झाला; पण दर्शन परंपरा ज्या तार्किकतेचा पुरस्कार करते, त्या रीतीने तात्त्विक विचार करण्याचे शिक्षणच मिळाले नाही. भारतीय लोकशाही अशा भावुक, भाबडय़ा सामान्य जनतेच्या आधारावर विकसित होते आहे. परिणामी, दु:खमुक्ती या हेतूऐवजी ती अधिकाधिक दु:खाच्या खाईत लोटली जाते आहे.

Live Paper Link               Epaper Link


        'तत्त्वभान' सदरातील अडथळेच अडथळे (१४ ऑगस्ट २०१४) लेखाच्या शेवटून दुसऱ्या परिच्छेदात माझ्याकडून अनवधानाने एक चूक झाली आहे. 'संस्कृत देवे केली अन् प्राकृत काय चोरापासून झाली?' ही ओवी संत तुकाराम यांची नसून एकनाथ महाराजांची आहे. (संदर्भ एकनाथी भागवत अध्याय १ ओवी १२९).
      मूळ ओवी 'संस्कृत वाणी देवे केली अन् प्राकृत काय चोरापासूनि जाली?' अशी आहे. ओवी १२२ ते १३०मध्ये एकनाथ महाराज संस्कृत व प्राकृत (येथे मराठी) या भाषांची तुलना करतात. भाषाभिमानाऐवजी ज्ञान महत्त्वाचे, असा मुद्दा ते मांडतात.
            चुकीबद्दल मी दिलगीर आहे.

                                                                                           -श्रीनिवास हेमाडे, संगमनेर
Live Paper Link                    Epaper Link

Wednesday 6 August 2014

तत्त्वभान ३२ काठिण्यपातळी ! ०७ ऑगस्ट २०१४

सायमन ब्लॅकबर्न (जन्म १९५५)

 काठिण्यपातळी ! 
श्रीनिवास हेमाडे 
'हे वाचणे कठीणच' असा शिक्का तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांवर मनोमन मारला जातो.. समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे. उलट उत्तर मिळाले की समाजजीवनाच्या एका अंगाचा विकास होणार असतो. उत्तर दिले नाही तर ते अंग खुरटे बनते. समाजात उत्तरे नको असणाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांचाही विकास खुरटतो..
          या सदरात आपण तत्त्वज्ञान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विषयाची पुरेशी ओळख करून घेतली आहे. योग्य, सत्य व युक्त म्हणजे यथार्थ विचार कसा करावा, याचे प्रशिक्षण तत्त्वज्ञान या विषयात मिळते. तसा विचार केला नाही तर काय घडू शकते, असाही विचार आणि त्याचेही प्रशिक्षण तत्त्वज्ञान तुम्हाला देते. तत्त्वज्ञान कधीही आत्मस्तुती करीत नाही, इतरांनी केलेल्या स्तुतीला ते भाळत नाही आणि इतरांची िनदा करीत नाही; पण अतिशय काटेकोरपणे आणि नम्रतेने त्यांच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आणून देते. 
      तत्त्वज्ञान नेहमी मर्मभेदक आणि तांत्रिकदृष्टय़ा गुंतागुंतीचे असते, अशी अनेकांची तक्रार असते. तत्त्वज्ञानाचे एखादे पुस्तक वाचताना 'मला समजत नाही' अशी तक्रार झाली तर तिचे स्वरूप नीटपणे समजावून घेतले पाहिजे. 'मला समजत नाही' ही तक्रार एखादे पुस्तक, व्यक्ती, घटना, परिस्थिती अथवा एखादी संकल्पना यांच्याविरुद्ध नसते. तर 'मला समजत नाही' असे म्हणणे हे; तुमचे स्वत:विषयीचे म्हणणे असते. ते तुम्हाला तुमच्या ज्ञानात्मक मर्यादांचे आलेले आत्मभान असते. 
       याचा अर्थ असा की, व्यक्ती म्हणून तुमचा आणखी विकास करवून घेण्याची ती तुम्हीच निर्माण केलेली संधी असते. 'मला समजत नाही' असे म्हणणे, हे तुमच्या मनाच्या विविध जाणिवांच्या आणि मनाच्या रचनेची जाणीव होण्याच्या प्रयत्नांचे विधायक दर्शन असते. एखाद्याच्या बोलण्याने तुम्ही दुखावले जात असला तर तुम्ही नशीबवान आहात. आता तुम्हाला तुमचे मन, बुद्धी कसे काम करते हे जाणण्याची सुसंधी असते. म्हणून टीका नाकारू नका. तुमचे मन त्या दिशेला वळवून घ्या. 
       तुमच्या मर्यादांचे आत्मभान तुम्हाला अनंत ज्ञानाच्या अथांग क्षेत्राकडे घेऊन जाते. 'अज्ञानाचे ज्ञान हाच ज्ञानाचा शुभारंभ आणि म्हणून सद्गुणी होण्याचा प्रारंभ' हाच तर सॉक्रेटिसचा दावा होता. त्याला त्याच्या ज्ञानात्मक मर्यादांची अत्यंत सुस्पष्ट निर्णायक जाणीव होती. सॉक्रेटिसचा हा दावा म्हणजे त्याचा पूर्वसुरी थेल्सच्या (इ.स.पू. ६२४-५४६ ) मते, 'जगण्यातील सर्वात अवघड कथा म्हणजे स्वत:ला ओळखणे' या वचनाचा प्रतिध्वनी होता. 
        आता, 'तत्त्वज्ञानात अवघड काय असते?' असा प्रश्न आपण यथार्थपणे उपस्थित करू शकतो. तत्त्वज्ञान समजावून घेण्यात मूलत: अवघड असते का? की तत्त्ववेत्तेच ते अवघड बनवितात? याची दोन उत्तरे संभवतात. 
पहिले म्हणजे तत्त्ववेत्ते तत्त्वज्ञान अवघड बनवीत नाहीत. पण जे प्रश्न ते उपस्थित करतात, त्यांची मांडणी करतात ती त्रासदायक वाटू शकते. कोणत्याही विद्यमान प्रस्थापितांना, सामाजिक, आíथक, राजकीय किंवा सांस्कृतिकदृष्टय़ा बलशाली समाजगटांना अडचणीत आणतात. उदाहरणार्थ, सर्वोत्तम राजकीय व्यवस्था कोणती? विद्यमान जीवन हेच उत्तम जीवन आहे, याचा नतिक आधार कोणता? अशा तात्त्विक प्रश्नांना उत्तर देणे अवघड असते. म्हणजे प्रश्न सोपे असतात पण उत्तरे कठीण असतात. ती देण्याने अनेक हितसंबंध उघडकीस येणारे असतात आणि ते प्रस्थापितांना नको असते. कारण त्यांच्यावरही आदर्श नीतीचा दबाव असतो. ती नीती त्यांना सार्वकि हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडत असते. पण त्यांनी तसे केले की त्यांना मिळणारे सुख, सामाजिक लूटमारीचा त्यांचा वाटा कमी होतो. म्हणजे तत्त्वज्ञानाचे प्रश्न सोपे असतात आणि उत्तरे अवघड असतात. पण समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे. उलट उत्तर मिळाले की, समाजजीवनाच्या एका अंगाचा विकास होणार असतो. उत्तर दिले नाही तर ते अंग खुरटे बनते. समाजात उत्तरे नको असणाऱ्यांचाही समावेश असल्याने त्यांचाही विकास खुरटतो. तेही मागास बनतात. 
       आता, दुसरे उत्तर केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न (जन्म १९५५) यांच्याकडून मिळेल. सामान्य लोकांसाठी तत्त्वज्ञान जाणीवपूर्वक का उपलब्ध झाले पाहिजे? हा प्रश्न अगदी यथार्थपणे ब्लॅकबर्न उपस्थित करतात. त्यांच्या मते, प्लेटोपासून विसाव्या शतकातील विटगेन्स्टाइनपर्यंत अनेकांनी 'केवळ लोकांसाठी' तत्त्वज्ञान निर्माण केले, असा दावा केला जातो खरा; पण या सर्वाचे लेखन खरेच लोकसुलभ होते का? त्यांच्या तत्त्वज्ञानाचे हेतू खरेच लोकाभिमुख होते का? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. प्लेटोचे तत्त्वज्ञान वर्गव्यवस्था निर्माण करून केवळ श्रीमंत उच्चवर्गीयांना सत्ता बहाल करते. सामान्य लोक सत्तेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जातात. मग ते अवघड बनते, नकोसे होते. दुसरे, मध्ययुगात कांट, हेगेलपासून तत्त्वज्ञानाला अवघड रूप मिळाले. हे काही हेतुपूर्वक घडले नाही. पण पल्लेदार विधानांची मुक्त पखरण करीत, अनेक व्याकरणीय करामती करीत अनंत नियमांची गुंतागुंत करीत या उच्चकोटीच्या तत्त्ववेत्त्यांनी लेखन केले आणि तत्त्वज्ञान सामान्यांपासून दूर गेले, असे निरीक्षण ब्लॅकबर्न नोंदवितात. त्या काळात इंग्लिश ही जनभाषा असताना या विद्वानांनी प्रतिष्ठित व अभिजात समजल्या जाणाऱ्या जर्मन भाषेत लेखन करून तत्त्वज्ञान केवळ अभिजनांची मिरासदारी करून ठेवली. विशेषत: विसाव्या शतकात तत्त्वज्ञानाला कठीण विद्यापीठीय दर्जा देण्याचा नादिष्टपणा पराकोटीला गेला. सगळ्यांनी लेखनच तसे केले.
       विसाव्या शतकात भौतिकशास्त्राच्या बाबतीत असेच घडले होते. 'भौतिकशास्त्र इतके सोपे असावे की ते हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला वेटरलासुद्धा समजावून सांगता आले पाहिजे,' असे अन्रेस्ट रुदरफर्ड हा शास्त्रज्ञ म्हणत असे. आइनस्टाइनचाही असाच काहीसा दावा होता. त्याच्या मते तर बालकालाही समजेल अशा रीतीने भौतिकशास्त्राचे नियम लिहिता आले पाहिजेत. पण प्रत्यक्षात भौतिकशास्त्र अतिशय अवघड केले गेले, असे ब्लॅकबर्न स्पष्ट करतात. तेच तत्त्वज्ञानाच्या बाबतीत झाले. सामान्यजनांच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान नेहमी त्यांच्यापासून दूर जाईल असेच रचले गेले. विज्ञान जसे अनेक ठिकाणी तांत्रिक, गुंतागुंतीचे असते तसे तत्त्वज्ञानही असते, हे खरे. ते फारसे पातळ करता येत नाही, हेदेखील खरे. शुद्ध गणित किंवा विज्ञान, विशेषत: वैद्यक विज्ञान, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञानासारखे विषय कठीण असतात हे आपण समजू शकतो. अशा विषयांचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध येतोच असे नाही. पण तत्त्वज्ञान मात्र तुमचे रोजचे जगणे, जीवन ठरवीत असते. तुमचे आयुष्य कसे असावे, तुम्ही काय मिळवावे हेच निश्चित करीत असते, पण मग ते अवघड आहे, हे कसे पचवायचे? तत्त्वज्ञान रोजच्या जगण्याशी लगटून आहे. म्हणून त्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. ते सुलभ रीतीने मांडता आले पाहिजे. 
       ब्लॅकबर्न म्हणतात तशी, तत्त्वज्ञान सोपे करण्याची लाट पाश्चात्त्य-युरोपीय विचारविश्वात १९९०च्या दशकात आली. स्विस-ब्रिटिश तत्त्वज्ञ-लेखक अ‍ॅलन डी बॉटन (जन्म १९६९), ब्रिटिश तत्त्वज्ञ अँथनी क्लिफर्ड ग्रेिलग (जन्म १९४९) आणि नॉर्वेजियन लेखक योस्टाइन गोर्डर (१९५२) यांनी असा प्रयत्न केला. त्यांच्या लेखनामुळे तत्त्वज्ञानाची भीती गेली, हा मोठा फायदा लोकांना झाला. 
      ब्लॅकबर्नच्या मते, तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध झाले पाहिजे, याचा अर्थ त्याचे सुलभीकरण करणे, असा करण्यापेक्षा लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे आणि लोकांना तत्त्वज्ञानाच्या रीतीने विचार करण्यास उत्तेजन देणे, असा करणे योग्य राहील. त्याचा फायदा असा होईल की जगाचे स्पष्टीकरण कसे करावे, ही समस्या न बनता जगाचे जे काही स्पष्टीकरण देण्यात आले आहे, देण्यात येते, ते समजावून घेण्याची क्षमता विकसित करणे, हे आपले लक्ष्य राहील.